जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:01 AM2019-12-14T00:01:12+5:302019-12-14T00:02:14+5:30
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.
बीड : केंद्र शासनाने लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केले आहे. मात्र, ते अन्यायकारक आहे, व संविधान विरोधी आहे. त्यामुळे देशामध्ये फाळणी होऊ शकते. त्यामुळे हे विधेयक धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे, घटनाविरोधी आहे. त्यामुळे ते तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलन करून मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलक डोक्यास व दंडावर काळ्या फिती लावून सहभागी झाले होते. यावेळी ‘सीएबी नाही शिक्षण, रोजगार पाहिजे’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
१३ डिसेंबर रोजी दुपारच्या नमाजनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सीएबी-एनसीआर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्र शासनाने आणले आहे. ते दोन्ही सभागृहात पास झालेले आहे. यामध्ये देशातील जवळपास सर्व जाती धर्मांना सामावून घेण्यात आले आहे. मात्र, मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या माध्यमातून देशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना नागरिकांधून व्यक्त केली जात आहे. असे विधेयक आणून केंद्र सरकार समाजासमाजात तेढ निर्माण करत आहे. तर या कायद्यामुळे संविधानाची पायमल्ली केली जात आहे. या कायद्यास देशभरात विरोध करण्यात येत आहे. याचे पडसाद बीड जिल्ह्यात देखील उमटले. सीएबीच्या विरोधात काल बीड सह धारूर, केज, माजलगावसह अन्य काही ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
शांततेत व शिस्तीत आंदोलन
बीड येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या हातात ‘सीएबी नाही रोजगार, शिक्षण, संरक्षण, अपराध मुक्त देश पाहिजे’ असे लिहिलेले घोषणाफलक होते. यावेळी शांततेत व शिस्तीत आंदोलन पार पडले.
संघटनेच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुफ्ती जावेद कासमी, मुफ्ती अब्दुल कासमी, सौलाना सय्यद साबीर, मौलाना जाकीर, मुफ्ती मोहीयोद्दीन, मौलाना इलियास कासमी, काझी जफर, अॅड शफीक , प्र.इलियास इनामदार, सौलाना अब्दुल रहीम, अब्दुल सलाम सेठ, महमद खामोद्दीन, माजी आ. सय्यद सलीम, न.प.उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी आ. सुनिल धांडे, संजय मालाणी, भागवत तावरे, अशोक हिंगे आदींनी मार्गदर्शन करून भारताच्या एकतेच्या व अखंडतेवर कोणालाही गंडातर आणू देणार नाही. आम्ही सर्व जण एकत्र येऊ असा नारा यावेळी दिला.