व्यापाऱ्यांचे पाण्यात बसून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:16+5:302021-09-08T04:40:16+5:30
माजलगाव : शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून ...
माजलगाव : शहरात निकृष्ट झालेल्या रस्त्याच्या कामामुळे व्यापाऱ्यांना पावसाळा येताच मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते तर अनेक दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असताना कोणीच लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांनी भर पावसात पाण्यात बसून आंदोलन केले.
माजलगाव शहरातील खामगाव-पंढरपूर या सिमेंट रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. हे काम सुरू असतानाच अनेक संघटनांनी हे काम निकृष्ट होत असल्याचा आवाज उठवला होता. संबंधित गुत्तेदाराने रस्त्यावरचे पाणी व्यवस्थित न काढून दिल्याने व केलेल्या नाल्या एकमेकाला न जोडल्याने जागोजागी पाणी साचत असल्याने अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी जाते. तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावरील नरवडे कॉम्प्लेक्स भागात अनेक दुकानात मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी दिसत होते. संभाजी चौकात साचलेले पाणी जाण्यासाठी नालीच नसल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.
मुख्य रस्त्यावरील हे पाणी अनेक दुकानांत गेल्याने दुकानदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मनोज फडके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी तीन वाजता मुख्य रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये बसून आंदोलन केले. यावेळी रवी गायकवाड, सतीश थोरात, अशोक कुलते, अमर बजाज व अमोल कामठे आदी नागरिक बसले होते.
070921\purusttam karva_img-20210907-wa0070_14.jpg