विघनवाडी ते बीडपर्यंतच्या रेल्वे मार्गाची ४, ५ फेब्रुवारीस जलदगती चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 18:34 IST2025-02-03T18:32:29+5:302025-02-03T18:34:19+5:30
मागील काही वर्षांपासून रेल्वे कामाची मंदावलेली गती दूर झाली असून कामास आता वेग आला असल्याचे दिसून येत आहे.

विघनवाडी ते बीडपर्यंतच्या रेल्वे मार्गाची ४, ५ फेब्रुवारीस जलदगती चाचणी
बीड : विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी ४, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही कळविले आहे.
बीड जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. मागील काही वर्षांपासून रेल्वे कामाची मंदावलेली गती दूर झाली असून कामास आता वेग आला असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता पुढील टप्पा पार पडत आहे. ४ फेब्रुवारी रोजी विघनवाडी ते राजुरी आणि ५ फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड या मार्गावरील रेल्वे लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडणार आहे. त्यामुळे संबंधित चाचणीलगत येणाऱ्या गावकऱ्यांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे. तसेच गुरे, पाळीव प्राणी इत्यादी चाचणी दरम्यान रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. लोहमार्गालगत चाचणी दरम्यान कोणीही वावरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधीचे पत्र उपजिल्हाधिकारी समन्वय यांनी पाटोदा, बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
वेगाने काम आहे सुरू
१) परळी-बीड-अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचे काम मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून रेल्वे कामास गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. एक-एक टप्पा पूर्ण होत असून रेल्वे काम आता गती घेत असल्याचे दिसून येत आहे.
२) यापूर्वी ५ जानेवारी २०२४ रोजी आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी घेण्यात आली होती.
३) विघनवाडी ते राजुरी या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी ३० ते ३१ डिसेंबरदरम्यान घेण्यात आली होती.
४) चालू वर्षात कामाने गती प्राप्त केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी विघनवाडीपर्यंत रेल्वे चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर ३० ते ३१ डिसेंबर रोजी चाचणी पार पडली होती. आता पुढील चाचणीचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.