बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या गुंडावर एमपीडीए कारवाई, हर्सूल कारागृहात केली रवानगी
By सोमनाथ खताळ | Published: January 11, 2024 09:22 PM2024-01-11T21:22:37+5:302024-01-11T21:22:54+5:30
पोलिस अधीक्षकांची कारवाई : दंगा करण्यासह इतर गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल
बीड: बीड शहरासह तालुक्यात दहशत माजविणाऱ्या गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याच गुंडाचा मराठा आरक्षणातील जाळपोळीतही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर दंगा करण्यासह इतर गंभीर स्वरूपाचे सह गुन्हे दाखल आहेत. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुरूवारी ही कारवाई केली.
समधान बाबुराव खिंडकर (वय २८ रा.बेलवाडी ता.जि.बीड) असे या गुंडाचे नाव आहे. या गुंडाविरोधात खूनाचा प्रयत्न करणे, जाळपोळ करणे, दंगा करणे, सरकारी नौकरावर हल्ला करणे, दरोड्याची तयारी करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे, दरोडा टाकणे, गैर कायद्याची मंडळी जमवणे, रस्ता अडवणे, घराविषयी आगळीक करणे, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत.
याची बीड शहरासह तालुक्यात दहशत होती. हाच धागा पकडून पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती यांनी त्याचा एमपीडीए प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ यांच्याकडे पाठविले. मुधोळ यांनी मान्यता देताच त्याला पिंपळनेर परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्याची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके, पोलिस निरीक्षक बालक काेळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती, हवालदार बहिरवाळ, अविनाश सानप, हवालदार अभिमन्यू औताडे, एलसीबीचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, अशोक कदम आदींनी केली.