बीडमधील गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी
By सोमनाथ खताळ | Updated: May 3, 2024 19:46 IST2024-05-03T19:46:09+5:302024-05-03T19:46:31+5:30
ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरीत्या केली.

बीडमधील गुंडावर एमपीडीए कारवाई; हर्सूल कारागृहात रवानगी
बीड : जाळपोळ, खुनाचा प्रयत्न करणे, रस्ता अडविणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुंडावर शुक्रवारी एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे. वैभव ऊर्फ स्वप्निल बाबासाहेब शेळके (रा. चक्रधरनगर, बीड) असे कारवाई झालेल्या गुंडाचे नाव आहे.
वैभवविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न करणे, रस्ता अडविणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, दंगा करणे, जाळपोळ करणे, दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, स्फोटक द्रव्य अधिनियम कायद्याचे उल्लंघन करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, कट रचणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अशा स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच याला वर्तवणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी वारंवार नोटीसही बजावण्यात आल्या; परंतु त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती.
अखेर शिवाजीनगर पोलिसांनी याचा एमपीडीए प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळताच त्याची अटक करून हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई शिवाजीनगर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तरीत्या केली.