MPSC Result: झेडपी शाळेत खाऊ शिजविणाऱ्या कष्टकरी आईची लेक झाली ‘मुख्याधिकारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 11:38 AM2023-05-27T11:38:49+5:302023-05-27T11:40:48+5:30
गरिबीची जाणीव ठेवून, जिद्दीने अभ्यास करत मिळवले यश
- मधुकर सिरसट
केज : तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मुंडेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत खाऊ शिजवून आपली उपजीविका भागवीणाऱ्या आईसोबत राहून एका गरीब कुटुंबातील प्रांजली मुंडे हिने एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून मुख्याधिकारी पदावर बाजी मारली आहे. स्वकृतृत्व, आईच्या कष्टाचे व परिश्रमाचे चीज करत मुख्याधिकारी बनत प्रांजलीने ग्रामीण मुलींसमोर आदर्श निर्माण केला आहे.
प्रांजली बाजीराव मुंडे यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेलं, त्यामुळे तिच्यासह मोठ्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी आई संगीता मुंडे यांच्यावर आली. त्यांनी कोरडवाहू शेती कसण्यासोबत गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनविण्यासाठी स्वयंपाकी म्हणून काम कर संसाराचा गाडा हाकला. दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केलं. प्रांजलीचे प्राथमिक शिक्षण मुंडेवाडी येथे झाले. इयत्ता सहावी-सातवीचे शिक्षण वाघेबाबुळगाव येथे, आठवी ते दहावीचे शिक्षण येळंबघाट (ता.बीड) तर अकरावी-बारावीचे शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात झाले. त्यानंतर तिने पुणे येथील परशुराम महाविद्यालयात बीए पदवीसाठी प्रवेश घेतला.
दरम्यान, पदवीच्या अभ्यासक्रमा सोबतच तिने स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरु केली . कोणत्याही खाजगी शिकवणीचा आधार न घेता स्वतः जिद्दीने व चिकाटीने अभ्यास केला. सन 2020 मध्ये एमपीएससीची पहिली परीक्षा दिली. त्यात ती मुलाखती पर्यंत गेली, परंतु 6 गुण कमी मिळाल्याने अंतिम यादीत प्रांजलीची निवड होऊ शकली नव्हती. पहिल्यांदा आलेल्या अपयशाने खचून न जाता तिने दुसर्या प्रयत्नात एमपीएससी 2021 ची परीक्षा दिली. त्यात तिला यश आले असून नगरपालिका मुख्याधिकारी -वर्ग 2 म्हणून तिची नुकतीच निवड झाली आहे. प्रांजली ही मुंडेवाडी गावातील पहिली अधिकारी ठरली असून तिच्या यशाबद्दल कुटुंबियांसह, ग्रामस्थांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
कोरानात सर्व विस्कळीत, पण निश्चय ठाम
पदवीसाठी प्रवेश घेतल्यापासूनच मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. कोविड काळात शिक्षणासह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे सर्वकाही विस्कळीत झाले होते. परंतु त्यानंतरही गरिबीची जाणीव ठेवून, जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. पूर्व, मुख्य, परीक्षा व मुलाखत असे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पार करत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केलं. माझ्या यशाचे श्रेय माझी आई आणि माझ्या गुरुजनांचे आहे.अशी भावना नवनियुक्त मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.