MPSCResult: पहिल्याच प्रयत्नात अन्न पुरवठा अधिकारी; बीडची वैष्णवी बायस राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 04:35 PM2024-06-20T16:35:48+5:302024-06-20T16:36:56+5:30

मेहनतीला फळ आलं; दररोज १२ तास अभ्यास करून यशाला गवसनी

MPSC Result: Food Supply Officer in First Attempt; Vaishnavi Bayas of Dharur tops the state | MPSCResult: पहिल्याच प्रयत्नात अन्न पुरवठा अधिकारी; बीडची वैष्णवी बायस राज्यात अव्वल

MPSCResult: पहिल्याच प्रयत्नात अन्न पुरवठा अधिकारी; बीडची वैष्णवी बायस राज्यात अव्वल

- सोमनाथ खताळ

बीड : एम.कॉम.चे शिक्षण चालू होते. असे असतानाच एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. वर्षभरात १२ ते १३ तास नियमित अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात अन्न पुरवठा अधिकारी पदाला गवसणी घातली. मूळची धारूर (जि. बीड) येथील रहिवासी असलेली वैष्णवी सुबोधसिंह बायस ही महिलांमूधन राज्यात अव्वल आली आहे. सध्या ती ठाणे येथे वास्तव्यास आहे.

वैष्णवीचा जन्म सामान्य कुटुंबातील आहे. आई अनुराधा यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले असून त्या गृहिणी आहेत, तर वडील जिल्हा प्रकल्प अधिकारी (सध्या ठाणे जिल्ह्यात कार्यरत) आहेत. वडील शासकीय नोकरीत असल्याने तिचे एका ठिकाणी शिक्षण झालेच नाही. नाशिक, जालना, सातारा, ठाणे आदी जिल्ह्यांमध्ये राहून तिने शिक्षण पूर्ण केले. सध्या ती ॲडव्हान्स अकाऊंटिंगमध्ये मास्टर आहे. वर्षभरापूर्वी तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. वडिलांप्रमाणेच शासकीय नोकरदार बनून जनसेवा करण्याचा तिचा मानस. म्हणून तिने दिवसरात्र १२ ते १३ तास अभ्यास केला. घरात मोठी असल्याने आईला मदत करत तिने अभ्यासावरही लक्ष केंद्रित केले. डिसेंबर २०२३ मध्ये अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात अन्न पुरवठा अधिकारी पदासाठी जाहिरात निघाली. तिने याचा अर्ज भरला. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी याची परीक्षा झाली आणि निकाल मंगळवारी रात्री उशिरा लागला. यामध्ये वैष्णवी ही महिलांमधून राज्यात अव्वल राहिली. पहिल्याच प्रयत्नात ती शासकीय नोकरदार झाल्याने कुटुंबाने आनंदोत्सव साजरा केला.

आईने निकाल पाहिला, वडिलांना फोन केला
मी घरातच होते. माझा निकाल आईने पाहिला. मी पहिली आल्याचे समजताच डोळ्यांत अश्रू आले. मी लगेच वडिलांना कॉल करून ही गाेड बातमी दिली. त्यांनाही यावर विश्वास बसत नव्हता. आपली मुले यशस्वी झाल्याचे पाहून त्यांनाही आनंद झाला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाले, यातच मला समाधान असल्याचे वैष्णवी सांगते. अजूनही पुढे अभ्यास चालूच ठेवणार असून क्लास वन अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे. या निकालाने विश्वास नक्कीच वाढला असून आगामी काळात उराशी बाळगलेले स्वप्न नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वासही वैष्णवीने बोलून दाखवला.

Web Title: MPSC Result: Food Supply Officer in First Attempt; Vaishnavi Bayas of Dharur tops the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.