महावितरणचे कार्यालय, अधिकारी दाखवा एक हजार रुपये मिळवा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:08+5:302021-03-26T04:33:08+5:30
चार वर्षानंतर प्रथमच मांजरा धरण भरले असून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ऊस लागवड मोठ्याप्रमाणात केली आहे. परंतु ...
चार वर्षानंतर प्रथमच मांजरा धरण भरले असून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ऊस लागवड मोठ्याप्रमाणात केली आहे. परंतु देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला याप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. महावितरण कंपनीने मार्च एन्डची वसुली तीव्र केल्यामुळे व डी.पी. बंद केल्यामुळे कॅनाॅलला पाणी असून ते शेतकऱ्यांना देता येत नसल्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. पाटोदा म. शाखा अभियंता कार्यालयांतर्गत एकूण १५ गावे येतात. परंतु काही मोजक्याच गावांमध्ये वसुलीचा घाट लावल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलेले जात आहे. तसेच पाटोदा म. येथील शाखा अभियंता कार्यालय हे गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांकडील बिलाची थकबाकी वाढल्याचे शेतकरी सांगतात.
या संदर्भात कार्यकारी अभियंता चाटे यांच्याशी संपर्क साधला असता अंबाजागाई तालुक्यात एकूण ९ अभियंता शाखा कार्यालय आहेत. त्यापैकी ७ कार्यालय हे ग्रामीण भागात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु पाटोदा म. येथील शाखा अभियंता कार्यालय बंद असल्याचे मला आज माहीत झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथे कोण अभियंता नियुक्त आहे, हे देखील त्यांना सांगता आले नाही ही खेदाची बाब असल्याचे सरपंच आनंद देशमुख, उपसरपंच गोविंद जामदार, शेतकरी नवनाथ गाडवे, धनराज पन्हाळे म्हणाले. त्यामुळे गावात महावितरणचे शाखा अभियंता कार्यालय दाखवा, एक हजार रुपये मिळवा, असे जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.