महावितरणचा जीवघेणा शॉक; तीन वर्षांत ८३ लोकांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:38+5:302021-02-12T04:31:38+5:30
सोमनाथ खताळ बीड : जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा सामान्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांनाही निष्काळजी अंगलट ...
सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा सामान्यांसाठी जीवघेण्या ठरत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांनाही निष्काळजी अंगलट येत आहे. मागील तीन वर्षांत तब्बल ८३ लोकांचा शॉक लागल्याने जीव गेला आहे, तसेच ६६ प्राण्यांचाही अशा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातांत वाढ होत असतानाही महावितरणकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
परळी शहरात एका चिमुकलीचा खेळताना खांबाला धक्का लागला. यात आगोदरच विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर केज तालुक्यातही विद्युत मोटार सुरू करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन दिवसांत दोघांचा बळी गेला. हाच धागा पकडून 'लोकमत'ने जिल्ह्याचा आढावा घेतला. यात मागील तीन वर्षांत अपघातात तब्बल ८३ लोकांचा जीव गेल्याचे समोर आले. यामध्ये २७ लोक महावितरणचेच कर्मचारी आहेत तर ५९ हे सामान्य नागरिक आहेत. मनुष्यहानीबरोबरच ६६ प्राण्यांचाही शॉक लागून मृत्यू झाला आहे. अपघातात वाढ झालेली असतानाही महावितरणकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. आजही खांब वाकलेले दिसतात. जम्पर व्यवस्थित नाहीत. तारा लोंबकळल्या आहेत. केवळ मेन्टेनन्सच्या नावाखाली कंत्राटदारांना पोसले जात आहे. दर्जाहीन कामे होत असल्यानेच आणि अभियंता, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अपघात कमी होत नाहीत. यात सामान्य नागरिकांसह निष्पाप प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
७२ मयतांना मिळाली मदत
आतापर्यंत ७२ लोकांना मदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना अपघाती विमा तर सामान्य नागरिकांना ४ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले. अद्यापही ११ प्रकरणांत मदत मिळालेली नाही. याची कारणे महावितरणला सांगता आली नाहीत.
मदतीसाठी वर्षभर हेलपाटे
वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील सखाराम वाळेकर या शेतकऱ्याचा घरावर तार पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या मुलाला वर्षभर मदतीसाठी महावितरणच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागले. माणूस गमावलेले असतानाही डोक्यावर दु:खाचे ओझे घेऊन वारसांना मदतीसाठी धावपळ करावी लागत आहे. महावितरणचे अधिकारी काही ना काही त्रुटी काढून हे प्रकरण नाकारण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे एकाचवेळी ही त्रुटी न काढता वारंवार काढली जाते. त्यामुळे नाहक त्रास होतो.
म्हैस दगावली; पण अद्याप मदत नाही
बीड तालुक्यातील वरवटी येथील बंडू वारभाऊ यांची म्हैस शॉक लागून दगावली होती. याचा पंचनामा करून इतर सर्व कारवाई झाली; परंतु अद्यापही त्यांना मदत मिळालेली नाही. बीड ग्रामीणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले; परंतु अद्यापही त्यांनी एक रुपयाचीही मदत हातावर टेकली नाही. केवळ राजकारण्यांसारखी आश्वासने दिली जात असल्याचे संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष राहुल वायकर यांनी सांगितले.
कोट
याबाबत सविस्तर माहिती मंगळवारी किंवा बुधवारी देईल. याची कारणे काय आहेत, हे कागदपत्रे पाहून सांगावी लागतील. आताच त्यावर काही सांगता येणार नाही.
रवींद्र कोळप
अधीक्षक अभियंता, महावितरण बीड.
----
अशी आहे आकडेवारी
महावितरणचे कर्मचारी मृत्यू - २७
सामान्य नागरिक मृत्यू - ५९
मदत मिळालेले - ७२
----
मनुष्यहानी
विभाग२०१८-१९२०१९-२०२०२०-२१
बीड १६ २६ १४
अंबाजोगाई १० १४ ३
एकूण २६ ४० १७
पशुहानी
विभाग२०१८-१९२०१९-२०२०२०-२१
बीड ४ १२ २५
अंबाजोगाई७ ११ ७
एकूण ११ २३ ३२