मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली

By अनिल भंडारी | Published: December 16, 2023 02:49 PM2023-12-16T14:49:34+5:302023-12-16T14:49:59+5:30

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने आमच्या दारी येऊ नये, असे बजावत घोषणाबाजी करत यात्रा परतवून लावली.

Mulukwadikar sent back the central government's yatra from the gate itself | मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली

मुळूकवाडीकरांनी केंद्र सरकारची यात्रा वेशीवरूनच परत पाठवली

लिंबागणेश : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने‘आपला संकल्प विकसित भारत’ योजना देशभरात राबविली जात आहे. २६ जानेवारीपर्यंत ही यात्रा गावोगावी पाहचून प्रचार- प्रसार करत आहे. दरम्यान १६ डिसेंबर रोजी तालुक्यातील मुळुकवाडी येथे सकाळी यात्रा आली असता, गावात प्रवेशाला विरोध करत आक्रम ग्रामस्थांनी वेशीवरूनच यात्रा परत पाठविली. 

मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीला पाठिंबा देण्यासाठी मुळूकवाडीत ग्रामस्थांचे साखळी उपोषण १५ दिवसांपासून सुरू आहे. शासनाचा यात्रारथ गावच्या वेशीजवळ आल्यानंतर‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने आमच्या दारी येऊ नये, असे बजावत घोषणाबाजी करत यात्रा परतवून लावली. यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावर ग्रामस्थांनी शासना विरोधाततिव्र संताप व्यक्त केला. यावेळी सरपंच रामकिसन कदम, उपसरपंच पांडुरंग कानडे, भास्कर ढास, बालासाहेब ढास, प्रविण ढास,खंडु ढास,दादा कदम, वैजनाथ कदम, रघुनाथ ढास, रामहरी ढास,कृष्णा कदम,खंडु कोटुळे,दिलीप ढास, संभाजी भोसले, राजेंद्र ढास,बाळु ढास आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कांदा निर्यातबंदी उठवा
मुळुकवाडी मधील ७५ टक्के शेतकरी कांदा उत्पादक असून केंद्र सरकारच्या अकस्मात निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या दरात तब्बल अडीच ते ३ हजार रूपयांनी घसरण झाली. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी. - रामकिसन कदम, सरपंच.

Web Title: Mulukwadikar sent back the central government's yatra from the gate itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.