बीडच्या महिला पोलिसाला मिळाली लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी, उच्च न्यायालयानं म्हटलं हा मुलभूत अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 03:46 PM2017-11-30T15:46:23+5:302017-11-30T17:21:04+5:30
बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिला लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
मुंबई - बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिला लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. लिंग बदल शस्त्रक्रिया ही मुलभूत अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी सुट्टी देण्याची जबाबदारी मॅटची असल्याचे न्यायालयाने सांगितले.
लिंगबदलासाठी एक महिन्याची सुटी मिळावी, तसेच त्यानंतर महिला कोट्यातून मिळालेली नोकरी नियमित करावी, यासाठी बीडची महिला पोलीस हवालदार ललिता साळवे हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ललिता साळवीने (२८) लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मागितली होती. मात्र, बीड पोलीस अधिक्षकांनी सुट्टी देण्यास नकार दिला. तसेच तिला ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.
त्यामुळे साळवेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ललिता ही २००९ मध्ये हवालदार म्हणून पोलीस दलात भरती झाली. सुट्टी मिळवण्याचा अर्ज मंजूर होण्यापूर्वीच तिने नोटाराईज करून नाव ललिता ऐवजी ललित साळवे लावण्यास सुरुवात केली आहे.
म्हणून लिंग बदलाचा निर्णय
ललिताची २३ जूनला जे.जे. रूग्णालयामध्ये शारिरीक चाचणीसाठी भरती झाली. वैद्यकीय चाचणीत तिच्यामध्ये वाय या पुरूषी गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले. तिने मानोसपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेतले. तिला जेंडर डायसोफोरिया असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे लिंग बदलाचा निर्णय घेतला.
- तिने शस्त्रक्रियेसाठी एक महिन्याची सुट्टी मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे केलेला अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे बीडच्या पोलिसांनी तिला सांगितले. वरिष्ठांचा हा निर्णय याचिकाकर्तीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com