बीडमध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ‘मुंडण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:52 PM2018-02-01T23:52:22+5:302018-02-01T23:54:07+5:30
जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व. डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. गुरुवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी २१ कार्यकर्त्यांनी मुंडन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
अंबाजोगाई : जनतेच्या विविध मागण्यांसाठी स्व. डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचचे नंदकिशोर मुंदडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह उपोषणास बसले आहेत. गुरुवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी २१ कार्यकर्त्यांनी मुंडन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
उपोषणास विविध सामाजिक संघटनांसह ५४ ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शविला आहे. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
केज मतदार संघातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अनेक निवेदने देऊनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचच्या वतीने २७ जानेवारीपासून नंदकिशोर मुंदडा व त्यांचे समर्थक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
परंतु प्रशासनाकडून उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या निषेधार्थ अंबाजोगाई व केज येथे मुंदडा समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. गुरुवारी उपोषणाच्या सहाव्या दिवशी २१ कार्यकर्त्यांनी मुंडन करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला. मानवलोक, भाकप व विविध सामाजिक संघटनांसह केज विधानसभा मतदार संघातील ५४ ग्रामपंचायतींनी पाठिंबा दर्शवून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
गत सहा दिवसांपासून मुंदडा यांचे उपोषण सुरूच आहे. प्रशासकीय पातळीवर केवळ कागदी घोडे नाचविण्याशिवाय ठोस उपाययोजना होत नसल्याने मुंदडाही त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
जोपर्यंत ठोस आश्वासन प्राप्त होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा नंदकिशोर मुंदडा यांच्यासह उपोषणार्थींनी दिला आहे.
आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, सहसंपर्क प्रमुख माजी आ. सुनील धांडे, माजी आ. बदामराव पंडित यांनी मुंदडा यांच्या उपोषणस्थळी भेट दिली.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना मागण्या मान्य करण्यासंदर्भात पत्र देण्याचे आदेश दिले आहेत.
महावितरणनेही मागण्या मान्य केल्याचे सांगितले परंतु इतर मागण्यासाठी मुंदडा यांचे उपोषण रात्री उशिरापर्यंत सुरुच होते.
जनतेच्या न्याय प्रश्नावर आंदोलन सुरू असतानाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र ‘दखल’ घेतली नाही. याबद्दल सर्वसामान्य जनतेतून नाराजीचा सूर होता.
लोहिया, पोटभरे म्हणतात...
सामान्य जनतेला रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ प्रशासनाने आणू नये. या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. अन्यथा प्रशासनाने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल व जनक्षोभ निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
- बब्रुवाहन पोटभरे
जिल्हा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सरळ मार्गाने जनतेचे प्रश्न व समस्या सुटत नसल्याने नंदकिशोर मुंदडा यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला. लोकशाही प्रणाली शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या उपोषणाची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे. मात्र, सहा दिवसांपासून प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. प्रशासकीय पातळीवर ठोस उपाययोजना होत नसल्याने उपोषणाचा कालावधी लांबविला जात आहे. या संदर्भात शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास झोपलेल्या सरकारला जनताच जागे करील.
- डॉ. द्वारकादास लोहिया
संस्थापक अध्यक्ष,
मानवलोक, अंबाजोगाई