मुंडे भगिनींच्या मौनामागे नाराजीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:27+5:302021-07-09T04:22:27+5:30
सतीश जोशी बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपाने धक्काच दिला नाही तर औरंगाबादच्या ...
सतीश जोशी
बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन लागोपाठ तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपाने धक्काच दिला नाही तर औरंगाबादच्या डॉ.भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. या एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींची नाराजी या राजकीय मौनातून उघडउघड दिसत आहे.
लोकनेते गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते म्हणून सर्वश्रूत होते. त्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतली. २०१४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री,’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी जगजाहीर केली. हीच नाराजी त्यांच्या राजकीय प्रवासात आज आड येत आहे. त्यांचे हे नाराजीचे सूर नंतर अनेक कार्यक्रमात पाहावयास मिळाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी जो फडणवीसांवर हल्ला चढवला होता, तो निश्चितच भाजपाला रुचला नाही. हा प्रकार पक्ष शिस्तीला धरून नव्हता, तर त्यास बंडखोरीची झालर होती. पंकजा मुंडेंनी गडावर बोलावून खडसेंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. हा झाला इतिहास.
२०१९ च्या पराभवानंतरही पंकजा यांनी जुळवून घेतले नाही तर प्रत्येकवेळी फडणवीसांना निशाणा साधून टीकाच केली. फडणवीसांच्या बीड दौऱ्यात मुंडे भगिनींचे रुसवे फुगवे पाहावयास मिळाले. या सर्व गोष्टींची नोंद पक्षश्रेष्ठी घेत होती आणि त्याचा परिपाक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात मुंडेंना स्थान मिळाले नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूूमीवर मुंडेंनी फक्त ‘आम्ही मुंबईतच आहोत,’ असे एकच ट्वीट केले होते. त्यानंतर मात्र त्या माध्यमांशी काहीही बोलल्या नाहीत. इकडे त्यांच्या समर्थकांनी मात्र समाज माध्यमांवर मात्र आपला संताप व्यक्त केला आहे. मुंडे भगिनींचे ‘सोशल मीडिया नेटवर्क’ तगडे आहे. संदेश देण्या-घेण्याचे काम या नेटवर्कवरून होते. हे संदेश अनेकवेळा पक्षासाठीही असतात. पंकजा मुंडे ह्या लोकनेत्या आहेत. ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत. राज्यात कुठेही जाऊन त्या गर्दी जमा करू शकतात. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी स्टार प्रचारक म्हणून उत्तम कामगिरी बजाववली होती. कुणी कितीही प्रयत्न केला तरी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाला कुणी पर्याय निर्माण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे.