बीड जिल्ह्यात मुंडे, पंडित कुटुंबात सर्वाधिक आमदार; त्यापाठोपाठ क्षीरसागर, सोळंके घराणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:43 PM2024-10-22T17:43:09+5:302024-10-22T17:45:28+5:30
बीड जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत.
बीड : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत तरी घराणेशाही स्पष्ट दिसून आली आहे. परळीचे मुंडे, गेवराईच्या पंडित घराण्यातच आतापर्यंत सार्वाधिक आमदार राहिले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही घरांमध्ये मंत्रिपदे आलेली आहेत. त्या पाठोपाठ बीडचे क्षीरसागर आणि माजलगावचे सोळंके कुटुंबही मागे नाही. यांनीही आमदारकीसह मंत्रिपद मिळविलेले आहे. बीड, माजलगाव, परळीतून नवख्यांना फार संधी मिळालेली नाही, हेही वास्तव आहे.
१९६२ नंतर ८९ आमदार झाले आहेत. यामध्ये १० महिलांना संधी देण्यात आली होती. इतर सर्व पुरुष आमदार राहिलेले आहेत. त्या पाठोपाठ कोणाच्या घरात किती आमदार राहिले, याची माहिती घेतली असता, सर्वात अव्वल क्रमांकावर परळीचे मुंडे कुटुंब आहे. त्यांनी परळी आणि रेणापूर अशा दोन मतदारसंघांतून आठ वेळा गुलाल उधळला आहे, तसेच गेवराईच्या पंडितांनीही सात वेळा गुलाल उधळत दुसरा क्रमांक पटकावला आहे. गेवराईमध्ये काही वेळा पवार कुटुंबाने पंडितांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु परळीत मुंडे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार मागील अनेक निवडणुकांमध्ये विजयी झालेला नाही. यंदा या मतदारसंघातून महायुतीकडून धनंजय मुंडे यांना आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार शोधला जात आहे. अद्याप तरी नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे याकडेही लक्ष लागले आहे.
मुंदडा सलग पाच वेळा आमदार
केज मतदार संघातून विमल मुंदडा या सलग पाच वेळा आमदार झालेल्या आहेत. यामध्ये त्यांनी आरोग्यमंत्रीपदही सांभाळले होते. त्यानंतर, २०१९ मध्ये त्यांची सून नमिता मुंदडा आमदार झाल्या आणि दुसऱ्यांदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
चार वेळा आमदार, दोन वेळा खासदार
गोपीनाथ मुंडे हे रेणापूर मतदारसंघातून १९८० साली पहिल्यांदा आमदार झाले. दुसऱ्या टर्मला पंडितराव दौंड आमदार झाले. त्यानंतर मात्र, सलग चार वेळा मुंडे आमदार राहिले. २००९ साली परळी मतदारसंघातून त्यांनी मुलगी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. त्यांनीही सलग दोन विजय मिळविले, परंतु २०१९ साली पंकजा यांचा पराभव झाला, तर धनंजय मुंडे विजयी झाले. २००९ सालीच गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभा विजयी झाले. २०१४ मध्येही त्यांनी विजय मिळविला. त्यांना केंद्रीय मंत्रिपदही मिळाले, दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे प्रीतम मुंडे खासदार झाल्या. २०१९ मध्येही डॉ.मुंडेच खासदार होत्या. २०२४ ला पंकजा यांना उमेदवारी दिली, परंतु बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला.
पंडितांच्या घरातच जास्त काळ आमदारकी
शिवाजीराव पंडित दोन वेळा आमदार राहिले त्यानंतर पुतण्या बदामराव पंडित यांनी त्यांच्याच विरोधात अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. बदामराव तीन वेळा आमदार राहिले. मधल्या काळात शिवाजीराव पंडित यांची चिरंजीव अमरसिंह पंडित एक वेळा आमदार राहिले. शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित यांना काहीकाळ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देखील मिळाली.
आमदार, मंत्री झाले, पण विकासाचे काय?
जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत. बीडमध्ये अद्यापही रेल्वे आली नाही, पाण्यासाठी मोठा प्रकल्प नाही. काही भागांत आजही दुष्काळी परिस्थिती आहे. रस्ते, वीज, पाणी आदी समस्या आजही कायम असल्याचे दिसते.
कोणत्या कुटुंबात किती आमदार झाले?
गेवराई
पवार कुटुंब - ४
पंडित कुटुंब - ७
--
माजलगाव
सोळंके कुटुंब - ५
--
बीड
क्षीरसागर कुटुंब - ३
---
चौसाळा
क्षीरसागर कुटुंब - ३
--
आष्टी
धस कुटुंब - ३
धोंडे कुटुंब - ४
--
केज
मुंदडा कुटुंब - ६
सोळंके कुटुंब - १
---
परळी
मुंडे कुटुंब - ३
---
रेणापूर
मुंडे कुटुंब - ५