महिलेवर अश्लिल शेरेबाजी करणा-या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:44 AM2018-10-13T09:44:43+5:302018-10-13T09:45:24+5:30
पुण्यातील महिला कार्यकर्त्यांवर टीकाटिप्पणी करुन अश्लिल शेरेबाजी करणा-या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेवर सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंटवरुन पुण्यातील महिला कार्यकर्त्यांवर टीकाटिप्पणी करुन अश्लिल शेरेबाजी करणा-या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आसाराम सानप, सुनिल एन फड, मनोज मुंडे, पोपट फुंदे, सुशेन नागरगोजे, दादा कुटे, योगेश देवरे, ज्ञानदेव खेडकर, सॅम गदादे, शरद वाघ, महेश एन एम मुंडे, गणेश नागरे, श्रीकांत घोळवे, दिनेश मुंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमध्ये शरद पवार यांची 1 आॅक्टोबरला जाहीर सभा झाली होती. या सभेनंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या जिल्ह्यात लक्ष घालावे, अशी टीका केली होती. त्यावर पुण्यातील महिला कार्यकर्तीने ‘ताई स्वत: ला सावरा’ अशी पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली. याला असंख्य कार्यकर्त्यांनी लाईक व कॉमेंट दिल्या. त्यानंतर मुंडे समर्थकांकडून या महिला कार्यकर्त्याला ट्रोल करण्यात आले. त्यांनी राजकीय पातळी सोडून वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली. कुटुंबाबरोबरचा त्यांचा फोटो टाकून त्यावर अश्लिल शेरेबाजी करण्यात आली. यामुळे आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आपल्या मनास लज्जा उत्पन्न झाली व कुटुंबास मानसिक त्रास झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी अगोदर गुन्हे शाखेकडे अर्ज केला होता. त्यानंतर तो सिंहगड रोड पोलिसांकडे आला. सिंहगड पोलिसांनी ५००, ५०१, ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.