मुंडे साहेबांनी लढायला शिकविले - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:33 AM2018-06-04T00:33:53+5:302018-06-04T00:33:53+5:30
मुंडे साहेबांनी आपल्याला कधीही रडायला नाही, तर सतत लढायला शिकवले. साहेबांचे ज्यांच्यावर जिवापाड प्रेम होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांचा साहेबांसोबत अतिशय स्नेह होता ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमच्या परिवाराशी घट्ट नाते असलेले श्रीमंत छत्रपती संभाजीराजे व सर्व व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर मंडळींमुळे मला आज मी खूप ताकदवान असल्याचं सतत जाणवते, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
परळी : मुंडे साहेबांनी आपल्याला कधीही रडायला नाही, तर सतत लढायला शिकवले. साहेबांचे ज्यांच्यावर जिवापाड प्रेम होते ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांचा साहेबांसोबत अतिशय स्नेह होता ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमच्या परिवाराशी घट्ट नाते असलेले श्रीमंत छत्रपती संभाजीराजे व सर्व व्यासपीठावरील सर्व दिग्गज मान्यवर मंडळींमुळे मला आज मी खूप ताकदवान असल्याचं सतत जाणवते, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी गोपीनाथगडावर विविध सामाजिक उपक्रम तसेच कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. आजचा दिवस सामाजिक उत्थान दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गोपीनाथगडावर प्रचंड गर्दी जमली होती. आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, ३ जून उजाडला की माझे मन सुन्न होते. तो दिवस मला आजही आठवतो आणि मन गंभीर होते. नियतीनेच मुंडे साहेबांवर वार केले अन्यथा ती ताकद कोणातही नव्हती.
आज गोपीनाथगडावर उभे असलेले मुंडे साहेबांचे स्मारक हे आम्हा सर्वांसाठी ऊर्जेचा स्रोत असून, हे स्मारक आम्हाला सतत प्रेरणा देते. मुंडे साहेबांनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्षयात्रा काढून महाराष्ट्रातील तळागाळातील माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचाच विचार घेऊन मी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन संघर्षयात्रा काढली आणि राज्यात सत्ता परिवर्तन झालं. आज आम्ही सरकारमध्ये असताना मुंडे साहेबांचे विकासाचे विचार घेऊन काम करतो आहोत. दीन, दलित, दुबळ्यांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी आपले आयुष्य झिजवले. त्याचमुळे आम्ही आज हा दिवस सामाजिक उत्थान दिवस म्हणून साजरा करत आहोत. मी सतत आपल्या सेवेत राहीन. ज्यांच्यामुळे मला प्रतिष्ठा मिळाली त्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो जणांना वाºयावर सोडणार नाही. मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, अशी भावना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी राम शिंदे, सदाभाऊ खोत यांनीही आपल्या भाषणात गोपीनाथरावांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले तर आ. आर. टी. देशमुख यांनी आभार मानले.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती खा. उदयनराजे भोसले, छत्रपती खा. संभाजीराजे भोसले, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मंत्री विजय देशमुख, दिलीप कांबळे, पाशा पटेल, आ. सुरजितिसंह ठाकूर, आ. भीमराव धोंडे, आ. आर. टी. देशमुख, आ. मोनिका राजळे, आ. शिवाजीराव कर्डीले, आ. बाबूराव पाचर्णे, आ. तानाजी मुटकुळे, आ. सुधाकर भालेराव, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, प्रवीण घुगे, विजय पुराणिक, माजी मंत्री सुरेश धस, केशवराव आंधळे, विजय गव्हाणे, प्रकाश महाजन, अशोक सामत, प्रताप पाटील चिखलीकर, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, आदित्य सारडा, भागवत कराड, भाऊराव देशमुख, गणेश हाके, रत्नाकर गुट्टे, सहाल चाउस, स्वरूपसिंह हजारी, ह.भ.प. राधाबाई सानप, आदिनाथ नवले, विजयराज बंब आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव
या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक जाणिवेतून कुस्तीपटू राहुल आवारे (पाटोदा), महिला क्रि केटपटू कविता पाटील (केज), अनाथांसाठी कार्य करणारे संतोष गर्जे (गेवराई), उसतोड मजुरांसाठी सुलभ ऊस वाहतूक यंत्र तयार करणारे प्रयोगशील शेतकरी गुरुलिंग स्वामी (उस्मानाबाद) यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महिलांना स्वयंरोजगार उपयोगी मशिनरीचे व मंजूर कर्जनिधीचे वितरण करण्यात आले.
प्रज्ञातार्इंच्या भेटीसाठी उदयनराजे खाली उतरले
खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्टेजच्या खाली उतरून समोर लोकांमध्ये बसलेल्या आईची म्हणजे प्रज्ञाताई मुंडेंची भेट घेतली. गोपीनाथरावांच्या आठवणीने ते भावनावश झाले. डोळ्यातील अश्रू ते रोखू शकले नाहीत. हा प्रसंग पाहून उपस्थितही गहिवरून गेले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खा. उदयनराजे यांचे स्वागत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी खा. संभाजीराजे यांचे तुळशी वृंदावन व स्मृतिचिन्ह देऊन केले. प्रज्ञाताई गोपीनाथ मुंडे यांच्यासह अॅड. यशश्री मुंडे, डॉ. अमित पालवे, गौरव खाडे, आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे आदी मुंडे कुटुंबिय याप्रसंगी उपस्थित होते.