मुंडे बहीण- भावांना वीज निर्मिती केंद्र चालू ठेवता आले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:57 PM2019-05-08T23:57:21+5:302019-05-08T23:58:57+5:30
येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद असल्याने वीज निर्मिती शून्यावर आली आहे. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मितीचा प्रकल्प परळी वैजनाथ येथे आहे. आणि हा प्रकल्पही या शासनाला व्यवस्थित चालविता येत नाही. परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र मुंडे बहिण- भाऊ चालू ठेवू शकले नाहीत, अशी टीका माजी ग्रामविकास राज्यमंत्री पंडितराव दौंड यांनी केली.
परळी व नवीन परळी औष्णिक विद्युत असे दोन केंद्र येथे आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील क्रमांक ३, ४, ५ हे तीन संच पाच वर्षांपासून बंद आहेत. तर नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ६ व ७ हे संच डिसेंबर २०१८ पासून बंद आहेत. तर आठ क्रमांकाचा एकमेव चालू संचही आता बंद ठेवला आहे. विजेची मागणी नसणे, एम ओ डी, मेरिट आॅर्डर डिस्पॅच रेटमध्ये बसत नसल्याने नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे एक हजार कामगारांना फटका बसत आहे. त्यातच जुने संचही बंद केले आहे. त्यामुळे येथील कामगार पुणे-मुंबई येथे स्थलांतरित झाले आहेत.
बंद पडलेले संच चालू करावेत यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याची माहिती थर्मल कॉन्ट्रॅक्टर व सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंगद हाडबे यांनी दिली. एमओडी रेटमधून परळीला वगळण्याची मागणीही त्यांनी केली.
ही शरमेची बाब
माजी राज्य मंत्री पंडिराव दौंड म्हणाले की,परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील जुने संच तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने काँग्रेसच्या काळात व नवीन संच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळात उभारले गेले. शासनाने परळीचे सर्वच बंद संच चालू केले पाहिजेत.
विशेष म्हणजे ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे हे सर्व परळीचेच असून सुद्धा त्यांना हा प्रकल्प सुरू ठेवता आला नाही, ही शरमेची बाब असल्याचे माजी मंत्री पंडित दौंड यांनी यावेळी सांगितले.