परळीतील २५ वर्षापासूनची 187 अतिक्रमणे नगर पालिकेने केली जमिनोध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 06:11 PM2017-11-21T18:11:35+5:302017-11-21T18:18:44+5:30
शहरातील मिलींद नगर लगत असलेल्या सर्व्हे नं. 75 (फुकटपुरा) मधील 187 घरांचे अतिक्रमणे नगर परिषदेच्या पथकाने आज सकाळी काढण्यास प्रारंभ केला.
बीड : शहरातील मिलींद नगर लगत असलेल्या सर्व्हे नं. 75 (फुकटपुरा) मधील 187 घरांचे अतिक्रमणे नगर परिषदेच्या पथकाने आज सकाळी काढण्यास प्रारंभ केला. दुपारपर्यंत 70% अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी नगर परिषदेचे १०० कर्मचारी उपस्थित होते. तसेच काही अनुचित घटना घडू नये यासाठी १५० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहराच्या सर्व्हे नंबर 75 मधील 18 एक्कर जागेत शहरातील कांही जणांनी 25 वर्षापुर्वी अतिक्रमणे केली होती. गेल्या 5 वर्षापासून अतिक्रमणे काढण्याचा इशारा नगर परिषदेच्या वतीने देण्यात येत होता. या प्रकरणी काही नागरिकांनी न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु; नगर परिषदेच्या बाजूनेच न्यायालयाने निर्णय दिला. यामुळे अतिक्रण केलेल्यांना स्वत:हून आपले अतिक्रमण काढावे लागले. आज सकाळी 9.30 वाजता नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दुपारी चार वाजेपर्यंत 70% अतिक्रमणे काढण्यात आली. सर्व अतिक्रमण बेकायदेशीर असल्याचे सिध्द झाल्याने आज सर्व नागरिकांनी स्वत: साहित्य काढून घेतले. कुठेही बळाचा वापर केला नाही, असे सहाय्यक कार्यालय अधिक्षक संतोष रोडे यांनी सांगितले.
यावेळी परळी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, नगर अभियंता आर.एच. बेंडले, कार्यालयीन अधिक्षक वामन जाधव, सहाय्यक कार्यालय अधिक्षक संतोष रोडे, स्वच्छता निरिक्षक श्रावणकुमार घाटे, मुक्ताराम घुगे, शंकर साळवे, अशोक दहिवडे, व्ही.बी. दुबे, व्ही.डी. स्वामी, सुदाम नरवडे, दत्ता भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आली होती.
स्मशानभूमी व कबरस्थानसाठी होणार उपयोग
परळी शहरातील सर्व्हे नं. 75 मधील घरांचे अतिक्रमणे मंगळवारी काढण्यास सुरूवात केली. ही जागा नगर परिषदेच्या मालकीची आहे. यातील कांही जागेत मुस्लीम समाजासाठी कब्रस्थान व दलित समाजासाठी स्मशान भुमी तयार करण्यात येणार आहे.
- डॉ. बाबुराव बिक्कड, मुख्याधिकारी नगर परिषद, परळी वै.