पालिका कर्मचाऱ्यांची उपासमार, तीन महिन्यांपासून वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:31 AM2021-02-07T04:31:04+5:302021-02-07T04:31:04+5:30
बीड : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होते. मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने ...
बीड : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होते. मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून सहायक अनुदान मिळत नसल्याने या अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. बीड नगरपालिकेत जवळपास ५२५ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी पालिकेला महिन्याकाठी दोन कोटी दहा लाख रुपये रक्कम लागते; परंतु शासनाकडून पालिकांना सहायक अनुदान मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन होत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होते. कोरोनासारख्या काळात आणि इतर वेळेतही पालिकेतील प्रत्येक कर्मचारी स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज या मूलभूत गरजा पुरविण्यासाठी दिवसरात्र धडपड करीत असतात; परंतु त्यांचेच वेतन वेळेवर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे वेतन लवकर अदा करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना संपर्क केला. ते म्हणाले, मी बैठकीसाठी औरंगाबादला आहे. थोडा वेळाने संपर्क साधतो; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांनी संपर्क साधला नाही.
पालिका कर्मचाऱ्यांची कायम उपेक्षाच
पालिका, नगरपंचायत कर्मचारी दिवसरात्र काम करतात; परंतु त्यांची वेतनासाठी कायम उपेक्षाच असते. इतर विभागाला वेळेवर वेतन दिले जाते; परंतु यांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांचे नियोजनही कोलमडते.
अशी आहे आकडेवारी
३५० पेन्शनर्स
५२५ कर्मचारी
२ कोटी १० लाख रुपये - वेतनासाठी लागणारी प्रतिमहिना रक्कम