हिरापूरमध्ये ‘मुन्नाभाई’ जेरबंद; फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:11 AM2019-04-25T00:11:55+5:302019-04-25T00:13:24+5:30
बीड : स्वत:जवळ एम.बी.बी.एस.ची पदवी नसताना बेकायदेशीररित्या गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे रुग्णांवर अॅलोपॅथीचे औषधी उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टराला अतिरिक्त ...
बीड : स्वत:जवळ एम.बी.बी.एस.ची पदवी नसताना बेकायदेशीररित्या गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे रुग्णांवर अॅलोपॅथीचे औषधी उपचार करणाऱ्या भोंदू डॉक्टराला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदरील मुन्नाभाईवर गेवराई पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चंद्रशेखर माधवराव गवळी (वय ६०, रा. गढी, ता.गेवराई) असे त्या भोंदू डॉक्टरचे नाव आहे. वैद्यकीय सनद नसतानाही चंद्रशेखर गवळी हा गेवराई तालुक्यातील हिरापूर येथे मुख्य रस्त्यावरील एका गाळ्यात बेकायदेशीररित्या रुग्णांवर अॅलोपॅथीचे औषधोपचार करत असल्याची गुप्त माहिती डॉ. संजय कदम यांना मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर डॉ. कदम यांनी मंगळवारी दुपारी १.३० वाजता नायब तहसीलदार जाधवर, डॉ. नेमाणी, तालुका आरोग्य पर्यवेक्षक ए.बी. पंडित, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लोकरे, पोलीस कर्मचारी चव्हाण यांच्यासह हिरापूर येथे जाऊन माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी गवळी हा भोंदू डॉक्टर पलक शरिफ शेख आणि कृष्णाबाई तुकाराम ढाकणे या रुग्णांवर अनधिकृतपणे अॅलोपॅथीचे उपचार करताना आढळून आला. डॉ. कदम यांनी अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे गवळीकडे बी.ई.एम.एस.ची सनद असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, या सनदेवर अॅलोपॅथीचे उपचार करता येत नाहीत. डॉ. कदम यांच्या पथकाने घटनास्थळाहून विविध कंपन्यांची औषधी, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या आणि गोळ्या जप्त केल्या. याप्रकरणी मादळमोहीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण लोकरे यांच्या फिर्यादीवरून गवळी याच्यावर गेवराई पोलिसात मेडीकल प्रोटेक्शन अॅक्ट अन्वये आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.