बेपत्ता मुकादमाचा खून करून मृतदेह गोदापात्रात फेकला, नात्यातील एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 07:07 PM2020-12-04T19:07:10+5:302020-12-04T19:08:29+5:30
मुकादम अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली देत मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदी पात्रात फेकुन दिल्याचे सांगितले.
माजलगाव : तब्बल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मारेकऱ्याला अटक करण्यात आली असून, मुकादमाचा मृतदेह सांगवीच्या गोदावरी नदी पात्रात टाकून दिल्याने मागील महिनाभरापासून बेपत्ता आहे.
माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील मुकादम अंकुश भाऊराव राठोड (वय-४५) हे दुचाकीवरून (क्र.एम.एच.२३ ए.एल.९२७४) १ नोव्हेंबर रोजी एका वाहकाला ऊस तोडणीसाठी आणायला वाटुर फाटा (ता.परतुर जि.जालना) येथे गेले होते. ते पुन्हा परतले नाही. याप्रकरणी शोध घेवुनही ते मिळुन न आल्याने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबर रोजी मुकादम अंकुश राठोड हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आष्टी पोलिसाकंडे देण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी तपास केला असता, त्यांच्या नात्यातीलच व्यक्तीला ताब्यात घेवुन त्याची चौकशी केली असता, या व्यक्तीने मुकादम अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली देत मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदी पात्रात फेकुन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना राठोड यांची मोटारसायकल आढळून आली. अंकुश राठोड यांचा मृतदेहाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.