स्वस्त धान्य दुकानासाठी सख्ख्या भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:01+5:302021-09-02T05:13:01+5:30
कडा : स्वस्त धान्य दुकानाच्या मालकी हक्कावरून दोन भावांतील वाद विकोपाला गेला. यात आठ जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत ...
कडा : स्वस्त धान्य दुकानाच्या मालकी हक्कावरून दोन भावांतील वाद विकोपाला गेला. यात आठ जणांनी मिळून केलेल्या मारहाणीत एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील भोजेवाडी येथे १ सप्टेंबर रोजी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, अंभोरा ठाण्यात आठ जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ज्ञानदेव आश्रुबा खटके (४२) असे मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित स्वस्त धान्य दुकान आहे. पुढे तीन भावांच्या वाटण्या झाल्यानंतर १८ वर्षांपासून लक्ष्मण आश्रुबा खटके हे दुकान चालवत. दोन वर्षांपूर्वी हे दुकान ज्ञानदेव यांच्याकडे आले. मात्र, दुकानाच्या मालकी हक्कावरून दोन भावांत धुसफूस सुरूच होती. याच रागातून ३० ऑगस्ट रोजी ज्ञानदेव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यात ज्ञानदेव यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. याच दिवशी अंभोरा ठाण्यात ज्ञानदेव यांचा मुलगा लहू याच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात आठ जणांवर मारहाणीचा गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. लक्ष्मण आश्रुबा खटके, सिंधुबाई लक्ष्मण खटके, बाळासाहेब लक्ष्मण खटके, युवराज लक्ष्मण खटके, मनीषा बाळासाहेब खटके, सचिन दादासाहेब लकडे, दादासाहेब रामराव लकडे, भागीनाथ रामराव लकडे यांचा आरोपींत समावेश आहे. तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे अंभोरा ठाण्याचे सहायक निरीक्षक रोहित बेंबरे यांनी सांगितले.
....
डोक्याला गंभीर दुखापत
ज्ञानदेव हे ऊसतोडी करीत. स्वस्त धान्य दुकान कोणी चालवायचे, यावरून ज्ञानदेव व लक्ष्मण खटके यांच्यात बेबनाव होता. मारहाणीत ज्ञानदेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आले नाही.