मुलीचे लग्न लावण्यास नकार देणाऱ्या पित्याची हत्या; झाशीवरून पुण्यात येताच त्रिकूट गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:43 PM2022-04-16T17:43:41+5:302022-04-16T17:44:24+5:30
अल्पवयीन मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पित्याने जाब विचारला होता
केज ( बीड): मुलीसोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्यावरून पित्याचा खून करून पसार झालेल्या तरुणासह त्याच्या दोन साथीदारांना केज पोलिसांनी १४ एप्रिल रोजी बेड्या ठोकल्या. पुण्यासाठी वाघोली परिसरातून त्यांना ताब्यात घेतले.
तालुक्यातील तांबवा येथील भागवत संदीपान चाटे याने अल्पवयीन मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने, जाब विचारण्यासाठी रमेश एकनाथ नेहरकर (४२, रा.बाराभाई गल्ली, केज) हे पत्नीसह त्याच्याकडे ८ एप्रिल रोजी गेले होते. तुमच्या मुलीचे माझ्यासोबत लग्न लावून द्या, अन्यथा जीवे मारीन, अशी धमकी त्याने नेहरकर यांना दिली होती. दुसऱ्या दिवशी नेहरकर हे साळेगाव जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले. केज-कळंब रस्त्यावरील गांजी पाटीजवळ लोखंडी रॉडने हल्ला करीत भागवत चाटे व त्याचे दोन साथीदार पसार झाले होते. लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान नेहरकरांचा ११ एप्रिल रोजी मृत्यू झाला. नातेवाइकांनी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट केजच्या पोलीस ठाण्यात आणून आरोपींच्या अटकेची मागणी करीत ठिय्या दिला होता.
अपर अधीक्षक कविता नेरकर, सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांना गतीने तपासाच्या सूचना दिल्या. वाघमोडे यांनी सहायक निरीक्षक संतोष मिसळे व उपनिरीक्षक राजेश पाटील यांची पथके रवाना केली होती. आरोपी हे केजवरून पुणे, झाशी (उत्तर प्रदेश) येथे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस नाईक दिलीप गीते, अशोक मंदे यांचे पथक झाशीकडे मार्गस्थ झाले. मात्र, त्यानंतर आरोपी हे पुणे येथे असल्याचे समोर आले. आरोपी हे वाघोली (जि.पुणे) येथील रसवंतीगृहात रस पित असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. भागवत चाटे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांची ओळख पटली असून, शिवशंकर हरिभाऊ इंगळे (वय २८, रा.इंगळे वस्ती, केज), रामेश्वर नारायण लंगे (वय २९, रा.जहागिर मोहा ता.धारूर) अशी त्यांची नावे आहेत.
पाच दिवसांची पोलीस कोठडी
तिन्ही आरोपींना १५ एप्रिल रोजी केज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली.