वैमनस्यातून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:13 AM2019-09-15T00:13:12+5:302019-09-15T00:13:40+5:30
जुन्या वादाच्या कारणावरुन एकाला धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी नवीन नागझरी (ता. गेवराई) परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड / गेवराई : जुन्या वादाच्या कारणावरुन एकाला धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी नवीन नागझरी (ता. गेवराई) परिसरात घडली. जिल्हा रुग्णालयात मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी समजूत घातल्यानंतर रुग्णालय चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली.
संजय काकासाहेब चव्हाण (वय २० वर्ष रा. नवीन नागझरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. नागझरी येथील वडार गल्लीत संजय हा शनिवारी दुपारी जखमी अवस्थेत पडलेला होता. दरम्यान, त्याच ठिकाणी त्याची बहीण पाणी आणण्यासाठी गेली होती. तिने संजयला पाहिल्यानंतर काय झाले असे विचारले. चौघांनी धारदार शस्त्राने पोटात व छातीत वार केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याच्या बहिणीने हा सर्व प्रकार घरी सांगितला. त्यावेळी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गेवराई पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले व संजयला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले.
त्याच्यावर त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वाटेतच संजयचा मृत्यू झाला होता. त्याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन मयत घोषित करण्यात आले. मात्र, ‘आता तर बोलत होता, मेला कसा’ असे म्हणत नातेवाईकांनी रुग्णालय परिसरातच गोंधळ घालायला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी वाढली होती. घटनेची माहिती पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेत पाहणी केली.
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर गेवराईचे पोलीस उपाधीक्षक स्वप्नील राठोड, पोलीस उप निरीक्षक शिंदे व इतर पोलीस कर्मचारी जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांनी पंचनामा केला असून नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत.
यामध्ये संशयित आरोपी म्हणून नारायण भारत पवार, पप्पू भारत पवार, आगलाव्या पवार, सरस्वती पवार, रोहिणी चव्हाण, संगीता उर्फ नॅशनल पवार, शिवकन्या पवार, सीमा पप्पू पवार, सोनी जावेद चव्हाण, गोट्या पवार, नवनाथ काळे व इतर काही जणांची नोंद करण्यात आली आहे.
नागझरी पुन्हा हादरली
पाच महिन्यापुर्वी ४ एप्रिल रोजी येथे याच ठिकाणी एकाच समाजातील दोन गटात जुन्या वादातून आमनेसामने भिडले होते. यावेळी झालेल्या तलवारबाजीत उत्तरेश्वर भारत पवार (वय २० वर्षे ) हा तरुण जागीच ठार झाला होता तर त्याचा मोठा भाऊ नारायण भारत पवार (वय २६ वर्षे) हा गंभीर जखमी झाला. याच घटनेचा राग मनात धरुन शनिवारी संजयवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगितले जाते.