इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च

By शिरीष शिंदे | Published: April 7, 2023 07:11 PM2023-04-07T19:11:12+5:302023-04-07T19:11:33+5:30

सदरील योजनेचा लाभ घेणारा इच्छुक विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.

Must be admitted to an English medium residential school; Tribal Development Department will bear the entire cost | इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश हवाय; आदिवासी विकास विभाग करणार संपूर्ण खर्च

googlenewsNext

बीड : अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. सदरील योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकड यांनी दिली.

सदरील योजनेचा लाभ घेणारा इच्छुक विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी, विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्या संबंधित छायांकित प्रत व दारिद्र्यरेषेचा अनुक्रमांक नमूद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख एवढी असून, यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे. अर्जासोबत पालकांनी संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साइजचे फोटो, जन्मतारखेचा पुरावा व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडावे, योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोट, निराधार व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्राधान्य देण्यात येईल.

विद्यार्थ्यांचे पालक शासकीय, निमशासकीय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध असून ३० एप्रिलपर्यंत परिपूर्ण अर्ज जमा करणे आवश्यक आहे. सदरील योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Must be admitted to an English medium residential school; Tribal Development Department will bear the entire cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.