'त्या' प्राण्याचे गुढ कायम...रविवारी पुन्हा एक शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 01:46 PM2020-12-20T13:46:18+5:302020-12-20T13:46:18+5:30
याभागात इतर प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळली नसुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
धारूर ः शहराजवळच असलेल्या गोपाळपुर शिवारात अज्ञात प्राण्याने रविवारी 20 डिंसेबर रोजी ही एका म्हशीचा फडशा पाडला. दोनच दिवसांपुर्वी एक शिकार केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी दुसरी घटना घडली. यामुळे मात्र शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत असून दहशत पसरली आहे. जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या बिबट्या ठार झाला असला तरी सदरील प्रकार काय याची उत्सूकता लागून आहे.
गोपाळपूर शिवारातील शेतकरी आवेज हाजी अब्दूल रशीद कुरेशी यांच्या शेतातील म्हैस (वगार) अज्ञात प्राण्याने फस्त केल्याची घटना दि.16 रोजी घडली होती. आजही अशीच घटना उघडकीस आली असून त्याच ठिकाणी तशीच शिकार अज्ञात प्राण्याने केल्याचे दिसुन आले. सदरील मृत वगारीचा व घटनास्थळाचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी केली. यावेळी बिबट्या सारख्या हिंस्त्र पशूच्या पायांच्या ठशांचा शोध घेण्यात आला. मृत वगारीचे शवविच्छेदन करुन व्हिसेरा पाठवण्यात आला आहे. याभागात इतर प्राण्यांच्या पायाचे ठसे आढळली नसुन शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
सदरील शवविच्छेदन अहवाल सोमवारी उपलब्ध होईल अशी माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस. जी. वरवडे यांनी दिली. शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत सदरील प्राण्याचे गुढ कायम असून शेतकरी मात्र धास्तावले आहेत. याबाबत वनविभागाकडून सदरील शिकारी या लांडग्या सारख्या प्राण्याकडून होत असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.