पिस्तूलाचे गूढ कायम ! करूणा शर्माच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 01:56 PM2021-09-06T13:56:11+5:302021-09-06T13:57:36+5:30
करुणा शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून यावरून चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी)विरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड : करुणा शर्मा यांच्या परळी दौऱ्यातील नाट्यमय घडामोडींचा दुसरा अंक ६ सप्टेंबर रोजी समोर आला. शर्मा यांच्या गाडीत आढळलेल्या पिस्तूलवरून चालकावर गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली. मात्र संशयास्पद वस्तू डिकीत ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी सत्यता पडताळण्याचे काम सुरू असून करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून जमावाविरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन केल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी ६ सप्टेंबर रोजी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.मात्र, पिस्तूल ठेवले की होते याचे गूढ कायम आहे.
करुणा शर्मा प्रकरणी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी विविध खुलासे केले. ते म्हणाले, त्यांच्या परळी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना नोटीस बजावली होती. पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वैद्यनाथ मंदिरासमोर जमावाने त्यांना रोखले तेव्हा काही महिलांनी आम्ही वेगवेगळ्या जाती-समूहाच्या असून धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर तुम्ही बेछूट आरोप करू नका, असे म्हटले. यावेळी करुणा यांनी जातिवाचक शिवीगाळ केली तर याच वेळी त्यांच्या सोबत असलेल्या अरुण मोरे याने बेबी तांबोळी या महिलेवर चाकूहल्ला केला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राआधारे विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्याविरोधात अट्रोसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून यावरून चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी)विरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला अटक केली असल्याची माहिती अधीक्षक राजा यांनी दिली.
करुणा शर्मांसह एकास ॲट्रॉसिटी व खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक
दरम्यान, गाडीच्या डिकीत संशयास्पद वस्तू ठेवताना एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची पडताळणी सुरू असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली.गाडीत पिस्तूल होते की ठेवले याचे रहस्य कायम आहे. करुणा शर्मा यांच्या तक्रारीवरून बेकायदेशीर गर्दी केल्याने कोविड नियमांचा भंग केल्याचा गुन्हा शंभर ते दोनशे जणांवर करण्यात आला. पोलिसांकडून निष्काळजी झाली असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक आर. राजा यांनी दिला.
करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
करुणा शर्मा व अरुण मोरे यांना आज दुपारी अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तर चालक दिलीप पंडित याला परळी न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. दरम्यान, जातीवाचक शिवीगाळ करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेल्या करूणा शर्मांना अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.