नॅक समिती मिल्लिया कॉलेजला भेट देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:36 AM2021-02-09T04:36:20+5:302021-02-09T04:36:20+5:30
कार्यालयाच्या भिंती थुंकल्यामुळे रंगल्या बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कोपऱ्यांमध्ये नागरिक व अधिकारी - कर्मचारी धुम्रपान ...
कार्यालयाच्या भिंती थुंकल्यामुळे रंगल्या
बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या कोपऱ्यांमध्ये नागरिक व अधिकारी - कर्मचारी धुम्रपान करून थुंकतात. थुंकल्यामुळे भिंती रंगलेल्या दिसत आहेत. हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी आहे.
वृक्षतोड थांबवावी
पाटोदा : तालुक्यातील डोंगरकिन्ही, अंमळनेर, वैद्यकिन्ही, निरगुडी, नायगाव या परिसरात सर्रासपणे अवैध वृक्षतोड होत असल्याचे दिसत आहे. वनविभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वृक्षमित्रांमधून केला जात आहे. वृक्षतोड थांबवण्याची मागणी नागरिक आणि वृक्षप्रेमींमधून होत आहे.
क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथे रेणूकाई क्रिकेट क्लबच्या वतीने रेणूकाई चषक २०२१ चे आयोजन करण्यात आले. याचे नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले. ३१ हजार रूपयांचे प्रथम बक्षीस शिऊर, ता. जामखेड येथील संघाने, २१ हजारांचे द्वितीय बक्षीस बेलगाव ता. आष्टीच्या संघाने, ७ हजार ७०० रूपयांचे तृतीय पारितोषिक अंबिकानगर येथील संघाने पटकावले आहे. यावेळी आ. बाळासाहेब आजबे, रमेश पोकळे, जि.प.सदस्य सतीश शिंदे, सतीश पोकळे, स्वप्नील गलधर, काकासाहेब शिंदे, सरपंच रामकिसन पोकळे, ज्ञानेश्वर पोकळे, ॲड. मंगेश पोकळे, देविदास पोकळे आदी उपस्थित होते.
अधीक्षक कार्यालयात अस्ताव्यस्त पार्किंग
बीड : येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात नो पार्किंगच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक वाहने लावत आहेत. त्यामुळे परिसर विद्रूप दिसत आहे. इतरांना नियम दाखवणारे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी येथे मात्र कारवाई करीत नाहीत.
ग्रामीण भागामध्ये बस सुरू करण्याची मागणी
वडवणी : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झालेली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. त्यातही चालक त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे घेत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
रिक्षातून अवैध वाहतूक जोमात सुरू
वडवणी : बीड, वडवणी, तेलगाव या महामार्गावर रिक्षा, जीपमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहतूक शाखेने या भागातही विशेष मोहीम राबवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतेअभावी नाल्या तुंबल्याने दुर्गंधी
बीड : शहरातील अनेक भागात नाल्या तुंबलेल्या आढळून येत आहेत. नगरपालिकेकडून वेळेवर स्वच्छता होत नसल्याने या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. येथे स्वच्छता मोहीम राबवावी आणि घाण दूर करावी, अशी मागणी रहिवाशांमधून होत आहे.
जनावरांचे लसीकरण करा
शिरूर कासार : तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण केरून घेतले असले तरी काही पशुधन अद्यापही यापासून वंचित राहिल्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मोहिम राबवत या जनावरांचे लसीकरण करावे, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.