नाद खुळा ! भोळसर व्यक्तीच्या बड्डेला डीजेचा दणदणाट अन शहरभर पोस्टर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 12:39 PM2022-01-03T12:39:26+5:302022-01-03T12:40:16+5:30
तरुणांची गांधीगिरी : डीजेचा दणदणाट, फुलांची उधळण अन् सेल्फीचाही थाट
माजलगाव : चमकोगिरी करत वाढदिवस साजरे करणा-या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी येथील तरुणांनी नववर्षाच्या सायंकाळी एका भोळसर व्यक्तीचा वाढदिवस मोठ्या थाटात केला. यानिमित्ताने शहरभर पोस्टर्स लावली गेली. फुलांची उधळण करत डीजेच्या तालावर थिरकत केक कापण्यात आला. यावेळी अनेकांनी सेल्फीही घेतली.या अनोख्या बड्डेची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
निवडणुका जवळ आल्या की गल्लीबोळातील कार्यकर्ते भावी नगरसेवक म्हणून पोस्टर्स लावतात. कधी जेसीबीतून फुलांची उधळण करतात तर कधी तलवारीने केक कापून चमकोगिरी करतात. काही जण स्वत:च्या वाढदिवसाला पदरमोड करुन मित्र-आप्तेष्टांचे फोटाे घेऊन पोस्टर्स तयार करुन ते चौकात लावतात. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकपदासाठीच्या इच्छूक कार्यकर्त्यांमध्ये तर पोस्टर्स लावण्याची अक्षरश: चढाओढ सुरू आहे. यामुळे शहर विद्रूप होते, शिवाय वाहनचालकांनाही त्रास होतो. याचा निषेध करण्यासाठी शहरातील तरुणांनी एकत्रित येत १ जानेवारीला शहरभर शेख अली या भोळसर व्यक्तीचे पोस्टर्स लावले. त्यांना भावी नगरसेवक म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. चमकोगिरी करणा-यांचा निषेध म्हणून गांधीगिरी करणारे तरुण एवढ्यावरच थांबले नाही तर रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डीजेच्या दणदणाटासह फुलांची उधळण करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. विशेष म्हणजे भरचौकात डीजेच्या तालावर तरुणाईची पावले थिकरली.
हेटाळणी करणा-यांनी घेतले खांद्यावर
एरवी अनेक जण शेख अली यांची हेटाळणी करत, कोणी अपमानित करत, पण शहरभर पोस्टर्स व जंगी वाढदिवसामुळे ते अक्षरश: भारावून गेले. अनेकांनी शेख अली यांना खांद्यावर उचलून घेत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांचे लाड पुरवत सेल्फीही घेतला. त्यामुळे ते सद्गतीत झाले होते.