नगरपंचायत निवडणुकीची आयोगाकडून तयारी झाली सुरु; नेतृत्वावरून मातब्बर नेत्यांमध्ये कुरघोडी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:45 AM2021-02-03T11:45:08+5:302021-02-03T12:14:51+5:30
Nagar Panchyat election आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये निवडणूक पूर्व तयारीला वेग
- अविनाश कदम
आष्टी : राज्यभरातील मुदत संपत आलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध करणे, सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दि 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तसा आदेश आज प्राप्त झाला असून आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातल्या आष्टी, पाटोदा, शिरूर मध्ये नगरपंचायत निवडणूकपूर्व हालचालींनी वेग घेतला आहे. यासोबतच स्वपक्षातील मातब्बर नेते निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार की विरोधात लढणार हे स्पष्ट झाल्यास निवडणुक तयारीत अधिक रंग भरतील.
निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. प्रभागनिहाय प्रारूप यादी प्रसिद्ध करणे दि 15 फेब्रुवारी आणि याच दिवसापासून प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. तर अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करणे दि 11 मार्च रोजी असणार आहे. यानंतर दि 8 मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या सर्व प्रक्रियानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आष्टी पाटोदा शिरूर नगरपंचायत निवडणूक हालचाल आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
उमेदवारी मिळण्यासाठी धडपड
तीनही तालुक्यातील नगरपंचायत निवडणुकीत इच्छुक कार्यकर्ते आपआपल्या वॉर्डात फिरून नागरिकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच आपल्यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यावर सध्या भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे.
स्वपक्षातील नेते एकत्र लढणार की विरोधात
आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन ही नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे आ. सुरेश धस, माजी आ. भिमराव धोंडे यांच्या भूमिकेकडे सध्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ते एकत्रित भाजपचे उमेदवार देतील ? की स्वतंत्र पॅनल उभा करतील या निर्णयानंतर निवडणुकीत रंग भरायला लागतील. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर, जिल्हा परिषद सदस्य सतिश शिंदे हे सध्या तरी एकत्र दिसत आहेत. मात्र, राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घेणार की स्वतंत्र लढणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.