नाल्यातील पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:45+5:302021-07-22T04:21:45+5:30
केज : शहरातील नाल्यांची साफसफाई नगरपंचायतीने पावसाळापूर्व केली नाही. पाऊस पडल्याने नाल्यात घाण साचल्याने पाणी शहरातील प्रमुख रस्त्यांवर येत ...
केज : शहरातील नाल्यांची साफसफाई नगरपंचायतीने पावसाळापूर्व केली नाही. पाऊस पडल्याने नाल्यात घाण साचल्याने पाणी शहरातील प्रमुख रस्त्यांवर येत आहे. नाल्यातील घाण पाणी अनेकांच्या घरांत जात आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तरी, नगरपंचायतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार, खासदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. काही निवाऱ्यांचा लोक चारा भरण्यासाठी, गुरे बांधण्यासाठी, चहा, पान दुकानांच्या व्यवसायासाठी वापर करीत आहेत. काही ठिकाणचे प्रवासी निवाऱ्यांचे पत्रे उडून पडझडही झाली आहे. संबंधित विभागाने सर्वेक्षण करून या प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
नवीन वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव
अंबाजोगाई : शहराच्या चारही बाजूने नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही वसाहती नगरपालिका तर काही वसाहती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात. या वसाहतींमध्ये मुख्य समस्या रस्त्यांची असून पावसाळ्यात रस्त्याअभावी ये-जा करण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. रस्त्यांबरोबरच वीज, पाणी, गटारी आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
कागदी ग्लास वापरण्याकडे दुर्लक्ष
बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता बाळगण्यासाठी टपरीचालकांनी ग्राहकांना कागदी ग्लासात चहा देण्याची गरज आहे. मात्र, अनेक विक्रेते काचेच्या ग्लासात चहा देऊ लागले आहेत. यामुळे संसर्ग उद्भवू शकतो. यासाठी कागदी ग्लासचा वापर प्राधान्याने करावा, अशी मागणी चहाप्रेमींमधून आहे.
विद्युत रोहित्रांना संरक्षक कवाडे नाहीत
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे आहेत. संरक्षक कठड्यांचा अभाव असल्याने संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रांमध्ये बिघाड होतो. उघडे फ्युज, तार व हे बॉक्स उघडेच असतात. या प्रकाराकडे महावितरणचे मोठे दुर्लक्ष होत आहे.
पांदण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रास
बीड : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात येताना-जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच शेतीमाल नेतानादेखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
शेतमजुरांना विमाकवचाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल, तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघाती प्रसंग ओढवल्यास शेतमजुरांना विमाकवच असले पाहिजे.
स्मशानभूमीत शेड उभारावेत
वडवणी : तालुक्यात जवळजवळ सर्वच गावांत अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीकाठी किंवा शेतात उघड्या जागेचा वापर करावा लागत असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वडवणी तालुक्यात ४५ गावांचा समावेश असून, ३५ ग्रामपंचायती व एक नगरपंचायत आहे. यापैकी केवळ कवडगाव, देवडी, खळवट लिमगाव, देवगाव, काडीवडगाव, कुप्पा, तिगाव, चिंचाळा या गावांना स्मशानभूमी असून, उर्वरित गावांत सुविधाच नाही. गैरसोय टाळण्यासाठी स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी होत आहे.