माजलगावात लॉकडाऊन नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:20+5:302021-05-11T04:36:20+5:30
माजलगाव : कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असताना माजलगाव शहरात मुख्य रस्त्यावर व विविध भागात दुकाने ...
माजलगाव : कोरोना रोखण्यासाठी शासनाने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू असताना माजलगाव शहरात मुख्य रस्त्यावर व विविध भागात दुकाने शटर बंद ठेवून आतमध्ये व्यवहार बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे चित्र रविवारी तसेच सोमवारी दिसून आले.
लॉकडाऊन सुरळीत चालू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले महसूल,पोलीस,नगर परिषद यांची पथके कोठे आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना रोखण्यासाठी शासन विविध प्रतिबंध घालून लोकांचा एकमेकांना संपर्क होऊ नये म्हणून उपाययोजना करत आहे. परंतु लोक या सूचना पाळीत नसल्याचे चित्र दिसत आहे. लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यांना हव्या त्या वस्तू दुकानदार दुकाने उघडून देत आहेत. असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. मोठी कापड दुकाने शटर वर करून ग्राहकांना आत प्रवेश देतात व शटर बंद करतात. खरेदी झाल्यावर ग्राहकांना बाहेर सोडतात अशा पद्धतीने काही दुकानात तर लग्नाचे बस्तेदेखील बांधले जात आहेत. याबाबत पोलीसही मौन बाळगून आहेत. शहरातील हनुमान चौकातील नाईक कॉम्प्लेक्स, धारूर रोडवर चहाची हॉटेल्स सर्रासपणे सुरू आहेत येथे तर सतत मोठी गर्दी असते,व पोलीसदेखील त्यांना न हटकता स्वतःच चहा पित असल्याचे दिसून येत आहे. मोंढ्यातदेखील अनेक दुकानाबाहेर मालक उभे राहून ग्राहक आला की त्यास पाहिजे ते साहित्य काढून देत असल्याचे चित्र रविवारी शहरात दिसून येत होते.तर लोकदेखील बिनधास्तपणे रस्त्यावर दिवसभर पायी व मोटरसायकलवर फिरताना दिसून येत होते. याबाबतीत पोलिसांना व नगर परिषद कर्मचारी यांना गांभीर्य नसल्याने लॉकडाऊन नावालाच सुरू असल्याचे बोलले जात आहे.