राष्टहिताविरुद्ध वागणाऱ्यांना काय शिक्षा द्याल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:34 AM2019-10-18T00:34:19+5:302019-10-18T00:35:25+5:30
जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला.
परळी (जि.बीड) : ३७० कलम रद्द करणे हा विषय आमच्यासाठी राजनीतीचा नसून देशभक्तीचा, राष्टÑहिताचा आहे. ही देशभावना आहे. त्यासाठी सर्वांनीच राष्टÑहित जोपासले पाहिजे. जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करून २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पेयजल पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांची गुरुवारी सकाळी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील जागेत जाहीर सभा घेण्यात आली. व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उमेदवार जयदत्त क्षीरसागर, रमेश आडसकर, नमिता मुंदडा, आ. सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
‘भारत माता की जय, जय शिव शंभो ’ अशी मोदी यांनी भाषणाची सुरु वात केली. बाबा वैद्यनाथांच्या पावनभूमीत व गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत, संतांच्या भूमीत आलो असल्याचे सांगून मोदी यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आज मला दोन बाबांचे म्हणजे बाबा वैद्यनाथ आणि समोर असलेल्या विशाल जनताजनार्दनाचे दर्शन घडले. मी सोमनाथांच्या भूमीतला. काशी विश्वनाथांपासून ते बाबा वैद्यनाथांपर्यत सर्व महादेवांची आमच्यावर कृपा आहे. गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन हे माझे मित्र. आज ते हयात नसले तरी त्यांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा यांचे कार्य प्रशंसनीय आहे. बीड जिल्ह्याने मागील निवडणुकीत अनमोल साथ दिली. या निवडणुकीत विक्रमी विजय होईल. मराठवाड्यात पाण्याचे संकट आहे. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. २०२२ पर्यंत घराघरात शुद्ध पाणी शासन पुरविणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे. विविध ४०० योजनांचे साडेआठ लाख करोड रु पये लाभार्थीच्या खात्यात जमा शासन करीत आहे. थेट पैसे मिळत असल्यामुळे ढापाढापी होत नाही. सरकारने गरिबांना मोफत उपचार, घर, वीज, गॅस सिलेंडर दिले आहे. केंद्र्र सरकार जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाºया पाच वर्षात घराघरात पाणी पोहोचविणार आहे. पाण्यासाठी साडेतीन लाख कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली. गोपीनाथराव मुंडे यांचे परळी- बीड -नगर रेल्वेचे व ऊसतोड कामगार महामंडळाचे स्वप्न पूर्ण होत आहे. वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे वाहून जाणारे पाणी वळविण्यात येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले.
लोकशाहीचा उत्सव दिवाळीसारखा साजरा करा
निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. तो दिवाळीसारखा साजरा करा. दोन दिवस सुटी आली असली तरीही वाजतगाजत मतदान करा, आपला पवित्र हक्क बजावा. हा योग कधी तरी येत असतो, असे मोदी म्हणाले.
महिलांनो, पुरुषांपेक्षा जास्त मतदान करा !
या सभेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यात महिला बचत गटांचाही समावेश होता. बचत गटांच्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली. यापूर्वी महिलांच्या मतदानाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी होते. लोकसभेला बरोबरीत आले आणि आता या निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी महिलांना केले. महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेतले. या मतदानाच्या आकडेवारीची माहिती मी मागवून घेईन, असे त्यांनी आवर्जून सांगितले.