‘राष्टÑवादीची कागदोपत्री, आमची कामे गुणवत्तेची’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:20 AM2019-02-04T00:20:12+5:302019-02-04T00:20:48+5:30
बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायला तोंड नाही असा घणाघाती हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बनसारोळा येथील जाहीर सभेत बोलताना केला.
केज : बीड जिल्ह्यातील विकासकामासाठी आलेल्या निधीत पूर्वीचे लोक सरकार चालवत. पूर्वी कागदोपत्री कामे केली जात होती. मात्र, आता गुणवत्ता असलेली कामे केली जातात. गेली चौदा वर्षे सत्ता भोगून सर्वसामान्याच्या कामी राष्ट्रवादी काँग्रेस आले नसल्याने त्यांना बोलायला तोंड नाही असा घणाघाती हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी बनसारोळा येथील जाहीर सभेत बोलताना केला. तालुक्यातील बनसारोळा जिल्हा परिषद गटात रविवारी एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रा. संगीता ठोंबरे या होत्या तर यावेळी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर, सभापती संदीप पाटील,ऋषिकेश आडसकर, जोगदंड, रमाकांत मुंडे आदी उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, बनसारोळा येथे वैद्यनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली. पूर्वी लोकांना ग्रामविकास मंत्रालयाचा २५/१५ चा निधी माहीत नव्हता. मात्र, हे खाते माझ्याकडे आल्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावास २५/१५ अंतर्गत विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. २८०० कोटी रुपये खर्च करुन रेल्वे आम्ही आणली. गल्ली ते दिल्लीपर्यंत आमची सत्ता असताना यांनी कामे कोठून आणत विकास केला असा प्रश्न त्यांनी केला. पवार साहेबांनी जिल्ह्यात डझनभर आमदार दिले मात्र रस्ते, सिंचनाची कामे त्यांच्याकडेच केली, असे त्या म्हणाल्या. आता जिल्ह्यातील कंत्राटी कामात बोगसगिरी चालत नसल्याचे मुंडे म्हणाल्या.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते आपण २०१९ पर्यंत पूर्ण होतील. ९१९ कोटी रुपयांचा निधी आपल्या खात्यातून दिला असून, ३ हजार बचतगट तयार केले तर पळसखेडा येथील बचत गटासही निधी दिला आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढल्याचे त्यांनी नमूद केले. आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेला निधी जनतेपर्यंत पोहचवला. होळ गटासाठी तब्बल ४० कोटी निधी दिला. आता केवळ भीमा अस्तरीकरण योजनेतून उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी धनेगाव धरणात सोडावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली. रमेश आडसकर म्हणाले की, यापूर्वी विकासकामांची केवळ उद्घाटने झाली. जे काम ज्यांनी आणले त्यांनीच त्याचे श्रेय घ्यावे. शिवाय दुष्काळी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. प्रास्ताविकात जि. प. सदस्या डॉ. योगिनी थोरात यांनी विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.