राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:48 PM2024-09-04T17:48:44+5:302024-09-04T17:49:39+5:30
पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेच्या हॉल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी जाताना तरुणीचा अपघाती मृत्यू!
- नितीन कांबळे
कडा: पोलीस भरतीची लेखी परीक्षा असल्याने दोन दिवस अगोदरच वाघोली येथे भावाकडे गेलेल्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरूणीचा मंगळवारी दुपारी हाॅल तिकीटचे झेरॉक्स काढण्यासाठी दुचाकीवर जात असताना भरधाव टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला. आरती पांडुरंग नागरे ( १९, रा.रूटी इमनगांव ता.आष्टी ) असे मृत तरूणीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील रूटी इमनगांव येथील आरती पांडुरंग नागरे ही राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू आहे. तिची पोलीस भरतीची लेखी परिक्षा ४ सप्टेंबर रोजी पुणे येथे होती. यामुळे आरती दोन दिवस अगोदरच वाघोली येथील भावाकडे गेली होती. मंगळवारी दुपारी हाॅल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी आरती दुचाकीवरून जात होती. यावेळी वाघोलीवरून पुण्याच्या दिशेने खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटून आरतीच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात टिप्पर चालक शिवाजी तानाजी मुरकुटे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघाताची वार्ता समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे.
चार वेळी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभाग
आरती ही कबड्डी खेळाडू होती. तिने चार वेळा राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली होती. तसेच तिने दोन वेळा महाराष्ट्राच्या कुमार संघाचे नेतृत्व देखील केले होते. तर खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. खेळातील याच योगदानाच्या आधारे आरती आता पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. मात्र, अपघाती मृत्यूने पोलीस होण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले.