Video: हळदीच्या कार्यक्रमात नवरदेव बेफाम, अत्यानंदात केला हवेत गोळीबार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 07:30 PM2022-03-28T19:30:04+5:302022-03-28T19:30:30+5:30
शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयातील घटना
अंबाजोगाई (बीड) : काही दिवसांपूर्वीच विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी जिल्ह्यातील रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले होते. या आमदारांच्या आरोपला पुष्टी मिळावी अशी आणखी एका घटना उघडकीस आली आहे. अंबाजोगाई शहरात शनिवारी (दि.२६) रात्री हळदीच्या कार्यक्रमात डिजेच्या तालावर नाचत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी चक्क पिस्तुलं बाहेर काढून हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली आणि पोलीस प्रशासनाने नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
शनिवारी रात्री अंबाजोगाईतील केज रोडवर असलेल्या एका मंगल कार्यालयात बालाजी भास्कर चाटे (रा. साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभ होता. हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नवरदेव असलेल्या बालाजीनेही जमलेल्या मित्रांसोबत डिजेच्या तालावर ठेका धरला. थोड्याच वेळात आनंद ओव्हरफ्लो झालेल्या बालाजी आणि त्याच्या मित्रांनी जवळील पिस्तुले काढली आणि हवेत गोळीबाराच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. कोणीतरी याचा व्हिडीओ केला आणि बघता बघता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला.
हळदीच्या कार्यक्रमात नवरदेव बेफाम,अत्यानंदात केला हवेत गोळीबार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील घटना pic.twitter.com/E95snyALg3
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) March 28, 2022
याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी पो.ना. गोविंद येलमाटे यांच्या फिर्यादीवरून बालाजी चाटे, शेख बाबा (रा. क्रांती नगर, अंबाजोगाई) आणि इतर तिघांवर अवैधरीत्या पिस्टल हातात घेऊन इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी कलम ३३६ सह शस्त्रास्त्र कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत. एरवी शांत म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबाजोगाई शहरात अशा वाढत्या घटनांमुळे चिंतेचे वातवरण आहे.