कोविड नियमांचे पालन करत भाविकांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 07:01 PM2021-10-07T19:01:32+5:302021-10-07T19:01:55+5:30
Navratri : नवरात्रोत्सवात मंदिर उघडण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले
परळी : तब्बल 17 महिन्यानंतर येथील वैद्यनाथ मंदिराचे दरवाजे शासनाच्या कोविड नियमांचे पालन करीत उघडण्यात आले. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. प्रभू वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी श्री वैद्यनाथाच्या पिंडीचे बाहेरून दर्शन घेतले. मंदिरात भाविकाना तोंडावर मास्क व हातावर सैनिटायझर बंधनकारक करण्यात आले.
शासनाने राज्यातील मंदिरे गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या भागाचे आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच दर्शन घेतले. यावेळी कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दर्शन घेताना सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर निश्चित करावा असे आवाहन त्यांनी केले.शहरातील कालरात्री देवी मंदिर आणि डोंगरतुकाई मंदिरातही जाऊनही त्यांनी दर्शन घेतले. नवरात्रोत्सवात मंदिर उघडण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. कालरात्री देवी मंदिर आणि डोंगरतुकाई मंदिरातही भाविक मोठ्या संख्येने आले होते. मंदिर परिसर गजबजला होता.
देवस्थान ट्रस्टच्यावतीने बुधवारीच मंदिरात स्वच्छता केली होती. तसेच कर्मचाऱ्यांना कोविड विषयक नियमांचे पालन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले होते.
- राजेश देशमुख सचिव ,श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट परळी.