योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ, घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:15 PM2017-09-21T17:15:11+5:302017-09-21T17:16:15+5:30
महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला.
अंबाजोगाई ( बीड) , दि. 21: महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास गुरुवारी सकाळी नऊ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व त्यांच्या पत्नी सरोजा स्वामी यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
२१ सप्टेंबर त ३० सप्टेंबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. गुरुवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व त्यांच्या पत्नी सरोजा यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. या महापुजेसाठी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर, सचिव भगवानराव शिंदे, देवीचे पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त, माजी आ. पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, बालासाहेब लोमटे, अॅड. शरद लोमटे, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, अक्षय मुंदडा, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा कुलकर्णी यांच्यासह मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दर्शनासाठी सर्वांना समान न्याय
महाराष्ट्रातील बहुतांशी तीर्थक्षेत्रांमध्ये दर्शनासाठी स्वतंत्र पास, व्ही.आय.पीं.ची स्वतंत्र व्यवस्था अन्यथा स्वतंत्र दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम आकारली जाते. अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत शक्तीपीठ असूनही इथे दर्शनासाठी सर्वांना समान न्याय आहे. पुरुषांची व महिलांची स्वतंत्र रांग असून सर्वांना समान दर्शन हा वेगळा उपक्रम योगेश्वरी देवल कमिटीने अस्तित्वात आणला आहे. अशी माहित योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव भगवानराव शिंदे यांनी दिली. तसेच नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात सलग नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.