राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:51 AM2019-09-27T00:51:48+5:302019-09-27T00:51:58+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्यावर भाजपा सरकारने ईडीमार्फत केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी परळी व आष्टी, तेलगाव बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकारने ईडीमार्फत केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी परळी व आष्टी, तेलगाव बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गेवराई आणि अंबाजोगाईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
बीड येथे राष्टÑवादी भवनात स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीक करीत प्रश्नांची सरबत्ती केली. भाजपच्या १६ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यात का गुन्हा दाखल केला नाही? असा सवाल करण्यात आला. या पत्रकार परिषदेत माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, अॅड. उषा दराडे, सुनील धांडे, संदीप क्षीरसागर, अॅड. डी.बी. बागल, गंगाधर घुमरे, फारुक पटेल आदी उपस्थित होते.
परळीत राष्ट्रवादीची बंदची हाक
परळी राष्ट्रवादीतर्फे बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी कार्यकर्ते राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकापासून बंदचे आवाहन करीत होते. दुकाने, प्रतिष्ठाने, बाजार पेठ बंद होती. या वेळी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष आयुब पठाण, नगरसेवक गोपाळ आंधळे अजित कच्ची, राजाखान, केशव बळवंत, रज्जाक कच्ची, दत्ता सावंत, संजय देवकर, तोफिफ, के. डी. उपाडे उपस्थित होते. धारुर तालुक्यातील तेलगाव येथेही बंद पाळण्यात आला. धारुरमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अंबाजोगाईत अटकेचा निषेध
अंबाजोगाईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून निषेध मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. या मोर्चात जि.प. सदस्य शंकर उबाळे, रंणजित लोमटे, रवि देशमुख, गणेश देशमुख, अविनाश उगले, नेताजी सोळूंके, अरूण जगताप, दत्ता सरवदे, हमीद चौधरी, बाळासाहेब पाटील, प्रशांत शिंदे सहभागी झाले होते.
गेवराईत तहसीलदारांना निवेदन
गेवराईत गुरुवारी शेकडो लोकांनी दंडाला काळ्या पट्ट्या लावून मूकमोर्चा काढत भाजपा सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी विजयसिंह पंडित, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा, अमोल तौर यांच्यासह इतरांनी विचार व्यक्त केले. ना.त. प्रल्हाद लोखंडे यांना निवेदन दिले.
आष्टीत तीव्र निदर्शने
आष्टी येथील अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळ राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे निदर्शने करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब आजबे, सतिश शिंदे, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, डॉ. शिवाजी राऊत, काकासाहेब शिंदे, डॉ. जालिंदर वांढर आदी सहभागी झाले.
मुंदडा, साठे गट मोर्चापासून अलिप्त
अंबाजोगाई तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद म्हणजे मुंदडा हे समीकरण जुळलेले आहे.
गुरुवारच्या या मोर्चापासून शांत असलेला मुंदडा गट अलिप्त राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आ. पृथ्वीराज साठे व त्यांचे सहकारीही या मोर्चापासून राहिल्याचे दिसून आले.
शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर निषेध नोंदविण्यासाठी जो मोर्चा निघाला त्यात ग्रामीण भागासह विविध ठिकाणचे कार्यकर्ते सहभागी होते.