गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:08+5:302021-01-19T04:35:08+5:30
गेवराई : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठ्या मादळमोही ग्रामपंचायतीमध्ये तळेकर व तलवाड्यात हात्ते यांना धक्का देत एकूण ...
गेवराई : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठ्या मादळमोही ग्रामपंचायतीमध्ये तळेकर व तलवाड्यात हात्ते यांना धक्का देत एकूण ९ ग्रामपंचायती जिंकून राष्ट्रवादीने बाजी मारली, तर भाजपकडे ५, शिवसेनेकडे ४, भाजप, शिवसेना युती १, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीकडे २ ग्रामपंचायती आल्या. यात राष्ट्रवादीने बाजी मारत सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापित केले.
तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. यात गोविंदवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होत राष्ट्रवादीकडे गेली. नंतर २१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८२.४० टक्के मतदान शांततेत पार पडले होते. सोमवारी तहसील कार्यालयात १२ टेबलवर ७ फेऱ्यांद्वारे अडीच तासात निकाल घोषित करण्यात आला. सुरुवातीला सर्वात मोठी ग्रामपंचायत मादळमोहीचा निकाल घोषित झाला. यात प्रस्थापित व गेल्या २० वर्षांपासून एकहाती सत्ता असलेले बप्पासाहेब तळेकर यांच्या शिवसेना व भाजप पॅनेलचा दारूण पराभव करत १७ पैकी १७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला; तर गेल्या २० वर्षांपासून तलवाडा ग्रामपंचायत ताब्यात ठेवणारे ॲड. सुरेश हात्ते यांच्या पॅनेलचा पराभव झाला. येथे राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीने १७ पैकी १७ जागा जिंकून हात्तेंची सत्ता संपुष्टात आणली. गढी ग्रामपंचायतीमध्ये उध्दव खाडे यांच्या पॅनेलचा पराभव करून ११ पैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. तालुक्यातील भंडगवाडी, डोईफोडवाडी, सुर्डी बु., चोपड्याचीवाडी, कुंभारवाडी, गंगावाडी तसेच गोविंदवाडी ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध करत राष्ट्रवादीने ताबा मिळविला, तर भाजपच्या ताब्यात पांढरवाडी, तळेवाडी, मन्यारवाडी, बाबुलतारा, टाकळगव्हाण अशा ५ ग्रामपंचायती आल्या. शिवसेनेने जव्हारवाडी, वंजारवाडी, मुळुकवाडी, खेर्डावाडी या चार ग्रामपंचायतींमध्ये विजय संपादन केला. चव्हाणवाडीत अपक्ष विजयी झाले. यात एकंदरीत निकाल पाहता राष्ट्रवादीचे तालुक्यात वर्चस्व राहिले आहे. यावेळी विजयी उमेदवारांनी तहसील कार्यालय परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
विजयापर्यंत धाव; पण नशिबाची थट्टा
खेर्डा ग्रामपंचायतीमधील वाॅर्ड क्रमांक २ मधील दोन उमेदवारांना सारखीच मते मिळाली. शरद कांदे यांना ६४, तर नवनाथ चव्हाण यांना ६४ मते मिळाल्यामुळे तहसीलदार सचिन खाडे यांच्या उपस्थितीत लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढून नवनाथ चव्हाण विजयी घोषित करण्यात आले, तर याच ग्रामपंचायतीमधील वाॅर्ड क्रमांक ३ मधून गयाबाई कादे यांना १०२, तर ज्योती रडे यांनाही समान १०२ मते पडल्याने चिठ्ठी काढून ज्योती साईनाथ रडे यांना विजयी घोषित करण्यात आले.
(सोबतचे दोन फोटो तहसील कार्यालयाच्या आवारात विजयी उमेदवार व कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना, दुसरा फोटो पोलीस बंदोबस्ताचा)