राष्ट्रवादीचा भाजपला दणका ! माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजुर यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:43 PM2020-11-06T17:43:02+5:302020-11-06T17:43:50+5:30
भाजपच्या रेश्मा दीपक मेंडके यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारे संख्याबळ दिसून येत नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला.
माजलगाव : येथील नगरपालीकेचे नगराध्यक्ष तीन महिने गैरहजर राहिल्याने त्यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर या पदासाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे केवळ राष्ट्वादीचे शेख मंजुर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज राहिला. यामुळे त्यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली असून आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
चार वर्षापूर्वी माजलगाव नगर पालीकेची निवडणुक झाली होती. यावेळी नगराध्यक्ष निवडणुक ही जनतेमधून होऊन भाजपा आघाडीचे सहाल चाऊस हे विजयी झाले होते. पालिकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चाऊस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान ते सतत तीन महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याची तक्रार उपनगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षपद रिक्त केले. त्यानंतर मागील तीन महिन्यापासून या रिक्त पदाचा पदभार हा सुमनबाई मुंडे यांच्याकडे होता.
दरम्यान, अध्यक्ष पदासाठी शासनाच्या नवीन नियमानुसार नगरसेवकांमधून अध्यक्ष करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानंतर अनेक राजकीय घडामोडी मागील काही दिवसात पहावयास मिळाल्या. अध्यक्षपदासाठी भाजपाकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी तर राष्ट्रवादीकडून शेख मंजूर यांनी उमेदवारी अर्ज भरले. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपच्या रेश्मा दीपक मेंडके यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारे संख्याबळ दिसून येत नसल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे शेख मंजूर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
न्यायालयीन प्रकरणांच्या निकालाची प्रतीक्षा
नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगाने तीन याचिका उच्च न्यायालयात दाखल असून यात बडतर्फी विरोधातील चाऊस यांची एक , शेख मंजूर यांच्या जात प्रमानपत्राबाबत दुसरी आणि एका नागरिकांच्या वतीने अध्यक्ष जनतेतूनच व्हावा म्हणून केलेली तिसरी यांचा समावेश असून यात न्यायालय काय निकाल देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे यामुळे शेख मंजूर हे बिनविरोध अध्यक्ष झाले असले तरी पदावर न्यायालयांच्या निकालाची टांगती तलवार कायम आहे.