धनंजय मुंडेंमुळे अपघातग्रस्त तरुणाला जीवदान; फोन करताच रुग्णवाहिका दोन मिनिटांत हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 10:46 PM2022-05-02T22:46:43+5:302022-05-02T22:49:16+5:30
मुंडेंच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तास वेळेवर मिळाली मदत
बीड: बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली. त्याच्या उपचारांची सोय केली आणि त्याच्या कुटुंबालादेखील धीर दिला.
बीडवरून परळीकडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघातग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली. धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली. आपले नाव महेश असून आपण पांगरी (ता. परळी) इथले असल्याचे त्याने सांगितले.
महेशच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. ते पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन करायला सांगितले. धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाल.; धनंजय मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या. तसेच रुग्णालय प्रशासनालादेखील याबाबत दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले; वेळेत उपचार मिळाल्यानं जखमी तरुणाचे प्राण वाचले https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/rbbLfxLc6I
— Lokmat (@lokmat) May 2, 2022
जखमी तरुणास अंबाजोगाईकडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघातग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली. तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय. रुग्णालयातदेखील मी बोललो आहे, अशी माहिती देऊन त्यांना महेशच्या कुटुंबाला धीर दिला. तसेच त्यांनाही अंबाजोगाईला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.