राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतली तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चेला उधाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:42 PM2023-03-04T17:42:25+5:302023-03-04T17:44:38+5:30
काही दिवसांपूर्वीच आ. प्रकाश सोळंके यांनी जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश करेल असे जाहीर केले होते.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आज हैदराबादमध्ये भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच आ. सोळंके यांनी जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश करेल असे जाहीर केले होते. यामुळे या भेटीने मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांनी के. चंद्रशेखरराव यांची हैदराबादमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत तेलंगणातील शेतकऱ्यांसाठीचे धोरण आणि योजना, राज्यातील विकास योजनांची आखणी, विद्यार्थी, मजूर, काम करण्याची पद्धत यावर चर्चा केली. तसेच तेलंगणात मेडिकल, इंजिनियरिंग सोबत अन्य उच्च शिक्षणासाठी सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांचा खर्च राज्य सरकार करते. महाराष्ट्रात देखील शेतकरी आणि उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणांसाठीच्या ठोस धोरणावर आ. सोळंके यांनी मुख्यमंत्री राव यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात बीआरएस पक्षाने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नांदेड येथील सभेने प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री राव महाराष्ट्रात पक्ष वाढविण्यावर भर देत आहेत. या पार्श्वभूमीवर आ. सोळंके यांच्या भेटीला महत्व आले आहे. आ. सोळंके बीआरएस पक्षात जाण्याचा देखील विचार करू शकतात अशी शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके हे वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यासोबत भेट घेऊन येत आहेत. त्यामुळे ते विविध पक्षावर दबाव तंत्राचा वापर करत असल्याच्या चर्चेवर विरोधकांकडून मात्र टीका होताना दिसून येत आहे.
जनतेची इच्छा असेल त्या पक्षात प्रवेश
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पंधरा दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर विचारले असता त्यांनी सांगितले होते की, जनतेची इच्छा असेल तर मी भाजपाच काय शिंदे गटात देखील जाऊ शकतो. त्याचबरोबर यावेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या कामाची स्तुती केली होती. यामुळे या पक्षात देखील ते प्रवेश करू शकतील असे त्यांच्या मनात विचार असल्याचे दिसून आले होते.