पीककर्ज वाटपाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सोशल डिस्टन्सिंगसह जमावबंदीचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:54 PM2020-07-10T18:54:12+5:302020-07-10T18:59:26+5:30
तालुक्यातील सादोळा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वाटपानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
माजलगाव : तालुक्यातील सादोळा येथे पीक कर्ज वाटपाच्या कार्यक्रमात आमदार प्रकाश सोळुंकेकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या जमावबंदीसह सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी पीककर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम राजकीय धुंदीत केल्याचा आरोप करत बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील सादोळा येथे तालुक्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाच्या वाटपानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राष्ट्रीयीकृत बँकेचे शाखाधिकारी संदीप कुमार व फिल्ड ऑफिसर बालाजी यांना बोलवण्यात आले. महामारीचे भयंकर संकट घोंगावत असताना आ.प्रकाश सोळंके यांनी यावेळी कर्ज वाटपाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली. या वाढलेल्या गर्दीमुळे राज्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे तीन-तेरा झाले तर सोशल डिस्टिंगचा ही फज्जा उडाला.
याबाबत भाजपा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी, पीककर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार प्रकाश सोळुंके यांनी राजकीय धुंदीत केला असून यामुळे तालुक्यात कोरोना महामारीचा धोका वाढला असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास भारतीय जनता पार्टीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर गर्दी जमवून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनासमोर आव्हान
सर्वसामान्यांना नियमांच्या कचाट्यात अडकून आतापर्यंत माजलगाव शहरात अनेकांवर कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तर गर्दीच्या कारणामुळे गुरूवार दि.11 रोजी शहरातील पाच व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नियमाची पायमल्ली करणाऱ्या एका डॉक्टरसह 15 लोकांवर मागे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी नियमांचे मोजमाप करणाऱ्या प्रशासनासमोर या घटनेतून सत्ताधारी आमदारावर गुन्हे दाखल करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.