...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:00 PM2024-06-03T19:00:45+5:302024-06-03T19:02:54+5:30
Beed Lok Sabha ( Marathi News ) : राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली. महायुतीच्या ...
Beed Lok Sabha ( Marathi News ) : राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच गाजली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यातील लढतीने नंतरच्या टप्प्यात जातीय वळण घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवर आक्रमक शाब्दिक हल्ले करण्यात आले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही ते हल्ले थांबले नाहीत. या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करणाऱ्या बजरंग सोनवणे यांनी आता मतमोजणीतही घोळ होण्याची भीती व्यक्त केली आहे. तसंच मतमोजणीला अवघे काही तास बाकी असताना पुन्हा एकदा सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे.
बजरंग सोनवणे यांनी काल ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या ठिकाणाची पाहणी केली आणि मतमोजणीच्या तयारीविषयी निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र या चर्चेदरम्यान सोनवणे यांचे अधिकाऱ्यासोबत मतभेद झाले आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करणार नसाल, हात आखडता घेणार असला तर मी स्वत:ला संपवून घेईन, असा संताप व्यक्त केला. मात्र मी असं वक्तव्य केलं नसल्याचा दावा करत माझं राजकारण संपवू नका, असं निवडणूक अधिकाऱ्याला म्हटल्याचं स्पष्टीकरण बजरंग सोनवणे यांनी दिलं आहे. सोनवणे यांच्या या भूमिकेबाबत आज पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
बजरंग सोनवणे यांनी मतमोजणीतील घोळाबाबत व्यक्त केलेल्या शंकेवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "निवडणूक अधिकाऱ्यांवर आरोप करून तुम्ही एका समाजाकडे बोट दाखवत आहात. हे चुकीचं आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझाही पराभव झाला होता. तो पराभव मी स्वीकारला आणि आता उद्या माझा विजय होणार आहे, तोही मी आनंदात स्वीकारणार आहे."
बीड लोकसभेत कसं आहे राजकीय चित्र?
बीड लोकसभेसाठी यावेळी तब्बल ४१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजनकडून अशोक हिंगे यांचा समावेश होता. परंतु, खरी लढत ही मुंडे आणि सोनवणे यांच्यातच झाली. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीत जातीचा मुद्दा चर्चेत राहिला. अगदी गावातील कॉर्नर बैठकीपासून ते देशाच्या नेत्यापर्यंतच्या सभांमध्ये जातीचा मुद्दा निघाला होता. तसेच यावेळी मतदानाचा टक्काही पावणे चारने वाढला होता. या सर्व टक्केवारीचा अंदाज आणि जातीय समीकरणे जुळवून कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे - प्रतिदावे केले जात आहेत. आपलाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु, कोणाचा दावा खरा ठरणार? हे ४ जून रोजी स्पष्ट हाेईल. सध्या तरी सगळीकडे निकालाचीच चर्चा सुरू आहे.
मुंडेंना कोणते मतदारसंघ तारणार?
पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. धनंजय मुंडे सोबत असल्याने पंकजा यांना याच मतदारसंघातून लीड मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच आष्टी मतदारसंघातही भाजपचा मतदार मोठ्या संख्येने आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. प्रीतम मुंडे यांना लीड ही आष्टीतून मिळाली होती. हे दोनच मतदारसंघ पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणात लीड देऊ शकतात. केज, गेवराई, माजलगाव हे त्यानंतर येतील. बीडमध्ये कमी लीड मिळेल, असे सांगण्यात येत आहे.
बजरंग सोनवणेंना बीड देणार आधार
२०१९च्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांना सर्वांत कमी मते बीड मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी जातीय राजकारण झाल्याने मुस्लीम, मराठा मतदार हे सोनवणेंच्या सोबत असतील. त्यामुळे बीड हे सोनवणेंना आधार देईल. यासोबतच माजलगाव, गेवराईमधूनही सोनवणेंना लीडची अपेक्षा आहे. होमपीच असलेल्या केजमध्ये कोणाला लीड मिळते? याकडेही लक्ष लागले आहे.