गेवराईत शरद पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादीचा मोर्चा; काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:22 IST2019-09-26T16:21:09+5:302019-09-26T16:22:42+5:30
या षडयंत्राचा जनता विधानसभा निवडणुकीत नक्कीच समाचार घेईल

गेवराईत शरद पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादीचा मोर्चा; काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध
गेवराई : खासदार शरद पवार यांच्या विरुध्द ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रत्येकांनी हातावर काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला. पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या नेत्याचा आवाज बंद करण्यासाठी रचलेल्या या षडयंत्राचा जनता विधानसभा निवडणुकीत नक्कीच समाचार घेईल असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी यावेळी केले.
गुरुवारी सकाळी दंडाला काळ्या पट्टया बांधून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय दरम्यान निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग होता. यावेळी नायब तहसिलदार प्रल्हाद लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात विजयसिंह पंडित, माजी उपनगराध्यक्ष शेख खाजा, अमोल तौर यांच्यासह मोठ्याप्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.