राष्ट्रवादीचा १५ तर शिवसेनेचा २१ ग्रामपंचायतीवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:35 AM2021-01-19T04:35:25+5:302021-01-19T04:35:25+5:30
बीड : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या ताब्यात ग्रामपंचायती आल्याचा दावा केला जात ...
बीड : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या ताब्यात ग्रामपंचायती आल्याचा दावा केला जात आहे.निवडणूक २९ ग्रामपंचायतींची झालेली असताना राष्ट्रवादीने १५ तर शिवसेनेने २१ ग्रामपंचायतींवर दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा
तालुक्यात निवडणूक झालेल्या २४ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून ३ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात १५ ग्रामपंचायती आल्याचा दावा करण्यात आला आहे. काटवटवाडी, मौज/ब्रह्मगाव, मौजवाडी या तीन ग्रामपंचायती रा.काँ.च्या बिनविरोध ताब्यात आलेल्या आहेत. तर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बहिरवाडी, आनंदवाडी, पिंपळगाव मोची, कळसंबर, कारळवाडी/निर्मळवाडी, पिंपळगाव मंझरा, नागझरी/मान्याचावाडा, गुंधा, भंडारवाडी, गुंधावाडी, नागापुर (बु.), कदमवाडी या ग्रामपंचायती आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेचा दावा
तालुक्यातील २९ पैकी २१ ग्रामपंचायतीवर भगवा डौलाने फडकला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे, महिला आघाडीच्या संगिता चव्हाण तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली २१ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला आहे. बीड तालुक्यात मौज, ब्रम्हगाव, मौजवाडी, मैंदा पोखरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, कारळवाडी, निर्मळवाडी, कर्जणी, कोळवाडी, गुंधा, जिरेवाडी, पिंपळगाव घाट, वासनवाडी, वंजारवाडी, गुंदावाडी, वायभटवाडी, बाळसापूर, बेलखंडी पाटोदा, वरवटी, आहेरधानोरा, मानेवाडी, भंडारवाडी या २१ ग्रामपंचायतीवर भगवा फडकल्याचा दावा करण्यात आला आहे. विजयी उमेदवारांचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, कुंडलिक खांडे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर सत्कार केला.
शिवसंग्रामचा ही शिरकाव
या निवडणुकीमध्ये आ. विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये शिवसंग्रामचा शिरकाव झाला आहे. बीड तालुक्यातील कर्झनी, पिंपळगाव घाट, वरवटी धानोरा, पालवन, मानेवाडी ,बेलखंडी पाटोदा तसेच शिरूर तालुक्यातील येवलवाडी वंजारवाडी, टाकळवाडी धनगरवाडी खरगवाडी, हटकरवाडी आवळवाडी व गेवराई तालुक्यतील भडंगवाडी,गंगावाडी या ग्रामपंचायतींमध्ये शिवसंग्राम समर्थक उमेदवारांनी विजय मिळविल्याचे शिवसंग्रामकडून सांगण्यात आले. विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.