राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प भाजपच्या वाटेवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:21 AM2019-05-23T06:21:22+5:302019-05-23T06:21:31+5:30
३० एप्रिल रोजी आमदार हनुमंत डोळस यांचे मुंबईत कर्करोगाने निधन झाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला असतानाच, आता सोलापूरमधील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस हे भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.
हनुमंत डोळस यांच्या निधनानंतर संकल्प यांच्याकडे येथील भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजयासिंह मोहिते-पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून हनुमंत डोळस ओळखले जायचे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप संकल्प डोळस यांना माळशिरसचे तिकीट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी संकल्प यांच्याशी संपर्क साधला असता, यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
३० एप्रिल रोजी आमदार हनुमंत डोळस यांचे मुंबईत कर्करोगाने निधन झाले. गेली १० वर्षे ते माळशिरसचे आमदार होते. काल मंगळवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार डोळस यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळेस संकल्प भाजपत प्रवेश करतील असा तर्क अनेकांनी लावला होता.