शेती, औद्योगिक विकासासाठी नदीजोड प्रकल्प काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:36 AM2019-09-20T00:36:14+5:302019-09-20T00:37:01+5:30
सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत तथा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ.दि.मा.मोरे यांनी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नदीजोड प्रकल्प राबविल्यास शेतीसह औद्योगिक विकास होऊन ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत तथा पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त महासंचालक डॉ.दि.मा.मोरे यांनी केले.
येथे भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता आबासाहेब कोकाटे उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, मराठवाडा व पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागासाठी नदीजोड प्रकल्पाची मोठी गरज आहे. नदीजोड ही योजना पूर्वापार चालत आलेली असून इतिहास काळातही याचा उल्लेख आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
अधीक्षक अभियंता आबासाहेब कोकाटे म्हणाले, अवर्षणप्रवण मराठवाड्यासाठी नदीजोड प्रकल्प निश्चितपणे उपयुक्त ठरेल. तसेच कृष्णा खोऱ्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
उपअभियंतापदी पदोन्नती मिळालेले सुनील अपसिंगेकर, बंग, वेडे यांच्यासह मिलिंद चिंचपूरकर यांना क्रेडाई व रोटरी तर्फे आदर्श अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. महेश कुलकर्णी यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक उत्तमराव मिसाळ, संच्वालन नितीन गोपन यांनी केले. संजय खंदाट यांनी आभार मानले. उत्तमराव मिसाळ, कुलदीप धुमाळे, बलभीम जाहेर पाटील, प्रकाश भांडेकर, पांडूरंगराव तोंडे, सतीश देशपांडे, हरिकिशन सारडा, त्रिंबक देशपांडे, केंडे, देविदास वारकरी, रमेश भालेराव, रावसाहेब वजुरकर, आल्हाद पालवनकर, राहुल बोरा आदींसह नागरिक उपस्थित होते.
नदीजोड शक्य मात्र खर्चिक
नदीजोड योजना अजिबात अशक्य नाही मात्र खर्चिक असल्याने शासन तिजोरीवर बोजा येणारी आहे. शेतीपेक्षा उद्योगधंद्यावर भर देण्याबाबत सर विश्वेश्वरैय्या यांनी त्या काळी अनेक योजना सांगितल्या आहेत. पर्जन्यमान जास्त असलेल्या कोकणातील वाहून जाणारे आणि समुद्राला मिळणारे पाणी तसेच पूर्व महाराष्ट्रातील नद्यांचे जास्तीचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे शक्य असल्याचे डॉ.मोरे यांनी प्रोजेक्टरद्वारे नकाशासहीत सांगोपांग विवेचन केले.