विड्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:15+5:302021-02-23T04:51:15+5:30
विडा : केज तालुक्यातील विडा येथे गेल्या ४० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. चाळीस पेक्षा जास्त गावे व ...
विडा : केज तालुक्यातील विडा येथे गेल्या ४० वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. चाळीस पेक्षा जास्त गावे व साठ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे लोक या विडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येतात. मात्र रूग्णांना पुरेसे उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावे लागतात.
विडा आणि परिसर हा जास्त प्रमाणात डोंगराळ भाग आहे. या परिसरात उसतोड कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. परिसरातील विविध गावातील ग्रामस्थ विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. पुरेसे आणि प्रभावी उपचार होत नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सर्पदंश, प्रसुती, अपघातातील गंभीर जखमी किंवा जास्त आजारी असणाऱ्या संबंधित रुग्णास केज, बीड किंवा अंबाजोगाई येथे उपचारासाठी न्यावे लागते. शहराचे अंतर जास्त असल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांना वेळीच परिपूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी विडा येथे ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. विडा आणि परिसरातील ग्रामस्थ ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतीक्षत आहे. लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालयाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी विडा, येवता, दहिफळ, देवगाव, शिंदी, पिंपळगाव, मस्साजोग आदी गावांतून होत आहे.
वीस ग्रामपंचायतींनी घेतले होते ठराव
पाच वर्षापूर्वी विडा आणि आजूबाजूच्या गावातून वीस ग्रामपंचायतींंनी विड्यात ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी मागणी करणारे ठराव घेतले होते. मात्र लोकप्रतिनिधी लक्ष देण्यासाठी तयार नाहीत. त्यामुळे प्रशासन हालचाल करत नाही, अशी स्थिती आहे.
राज्य सरकारकडे पाठपुरावा
विडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन इमारत मंजूर झाली असून त्याचे कामही अंतिम टप्प्यात झाले आहे. ग्रामीण रुग्णालयासाठी देखील प्रयत्न करणार असून त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे -विजयकांत मुंडे, जि. प. सदस्य विडा.